Last Updated on 17 Jan 2022 4:12 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली
मुंबई |
“शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला आहे. महाराष्ट्राने एक संघर्षशील नेतृत्व गमावले आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, “एन. डी. पाटील हे राज्याच्या पुरोगामी विचारांचे व्यासपीठ होते. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची मशाल त्यांनी शेवटपर्यंत पेटत ठेवली. लढणे आणि संघर्ष करणे हेच त्यांचे जीवन होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले ते एक बिनीचे शिलेदार होतेच, पण त्यानंतरच्या बेळगावसह सीमा लढ्यातील प्रत्येक आंदोलनात एन. डी. आघाडीवर होते. सीमा भागात जाऊन त्यांनी लढे दिले व पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचा चांगलाच स्नेह होता. महाराष्ट्राच्या विरोधात कोणी ‘ब्र’ काढलाच तर शिवसेनाप्रमुखांच्या बरोबरीने ‘एन. डी.’ उभे राहिलेच म्हणून समजा.
“अखंड महाराष्ट्रात बेळगावसह सीमा भाग यावा हा त्यांचा ध्यास होता. एखाद्या वादळासारखे ते शेतकरी, कष्टकऱ्यांच्या लढ्यात उतरत. महाराष्ट्रासाठी त्यांचे नेतृत्व प्रेरणादायी होते. एन. डी. पाटील यांच्या जाण्याने महाराष्ट्र राज्याचे अतोनात नुकसान झाले असून मी त्यांना महाराष्ट्र राज्यातर्फे आणि शिवसेनेतर्फे अभिवादन करतो,” अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी शोक व्यक्त केला.
परिवर्तनवादी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली
“महाराष्ट्राच्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील साहेब म्हणजे सामान्य माणसाचा संघर्षाचा कृतिशील विचार होता. सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत ते संघर्ष करीत राहिले. त्यांच्या निधनानं शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांसाठी लढणारं संघर्षशील नेतृत्वं हरपलं आहे. सीमाभागातील मराठीभाषक बांधवांचा आधारवड कोसळला आहे. प्रा. एन. डी. पाटील साहेब निर्भिड, नि:स्पृह, निडर नेते होते. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून त्यांनी काम केलं. वयाच्या नव्वदाव्या वर्षीही रस्त्यावर उतरुन संघर्ष करणाऱ्या प्रा. एन. डी. पाटील साहेबांचं निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीची मोठी हानी आहे. आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकारमध्ये त्यांनी सहकारमंत्री म्हणून काम केलं. आमदार म्हणून काम केलं. विधानमंडळातील प्रत्येक क्षण आणि प्रत्येक शब्द हा वंचित बांधवांना हक्क मिळवून देण्यासाठी उपयोगात आणला. प्रा. एन. डी. पाटील साहेब हे आमच्या कुटुंबातील सदस्य होते. त्यांचं निधन हे महाराष्ट्रातल्या, सीमाभागातल्या प्रत्येक कुटुंबाची हानी आहे. मी प्रा. एन. डी. पाटील साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करीत प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.
शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्याच्या प्रश्नांची तड लावणारे नेतृत्व हरपले- जयंत पाटील

प्रा. एन. डी. पाटील यांनी निस्पृहपणे शेतकरी, कामगार वर्गासाठी आयुष्यभर जोमाने संघर्ष केला. अत्यंत अक्रमक शैलीत आयुष्यभर सत्तेच्या विरोधारात राहुन लढा देण्याची भूमिका त्यांनी स्विकारली. प्रा. एन. डी. पाटील हे शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्याच्या प्रश्नांची तड लावणारे नेतृत्व हरपले, अशा शब्दात जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रा. एन. डी. पाटील यांना श्रध्दांजली अर्पण केली .
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, प्रा. एन. डी. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची जबाबदारी समर्थपणे पेलली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अत्यंत पारदर्शिपणे रयत शिक्षण संस्थेने कार्य केले. त्यांच्या निधनाने अनेकांचे नुकसान झाले आहे. विशेषत: वाळावा तालुक्यातील जनतेचे फार मोठे नुकसान झाले आहे. वाळवा तालुक्यातील भूमी क्रांतीकारकांना, विचारवंताना, समाजसुधारकांना जन्म देणारी भूमी आहे. या भूमीत प्रा. एन. डी. पाटील यांचा ढवळी येथे जन्म झाला. शिक्षणाच्या समार्थ्यांवर त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य केले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी गाठलेली मजल मोठी आहे. ती गाठत असताना सत्तेच्या वळचणीला न बसता, संघर्ष हाच आपल्या आयुष्याचा प्रमुख भाग बनविला. प्रा. एन. डी. पाटील हे शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्याच्या प्रश्नांची तड लावणारी नेतृत्व होते. कोल्हापुरात राहुन त्यांनी कोल्हापुरकारांच्या अनेक प्रश्नांची तड लावली. अशा या थोर नेत्याचे निधन झाले असून त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली.











































































