Last Updated on 04 Nov 2024 7:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून सविनय सादर करीत आहोत, हे शब्द आपल्या कानावरती पडतात तेव्हा आपल्या डोळ्यासमोर चित्र उभारते ते नाट्यगृहाचे म्हणजेच रंगभूमीचे!
आज 5 नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन
मराठी रंगभूमीचा इतिहास खूप मोठा आहे. विष्णुदास भावे यांच्या स्मृतिदिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात /भारतात हा दिवस साजरा केला जातो, विष्णुदास भावेंचा जन्म सांगलीमध्ये झाला म्हणून आणि विष्णुदास भावे यांनी पहिलं नाटक सांगलीच्या राजदरबारी सादर केलं. तर एकाच नाटकावरती ते न थांबता असंख्य नाटकाचे अनेक प्रयोग त्यांनी केले. म्हणूनच सांगलीला नाट्य पंढरी म्हटले जाते. हाच वसा आणि वारसा त्यांनी सांगलीच्या पुढच्या रंगकर्मींच्या हाती दिला, त्यामुळेच नाट्य क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा पुरस्कार त्यांच्याच नावे ‘विष्णुदास भावे गौरव पुरस्कार’ दिला जातो.
नाट्य क्षेत्रातील बऱ्याच रंगकर्मींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रंगभूमीचा हा प्रवास संगीत नाटकापासून सुरू होतो तर ऐतिहासिक नाटक कौटुंबिक नाटक कॉमेडी नाटक ते आत्तापर्यंतच्या वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणाऱ्या एकांकिका इथपर्यंतचा हा प्रवास खूप उल्लेखनीय आहे. म्हणूनच रंगभूमीच्या या प्रवासाला प्रेक्षकांनी दिलेली भरभरून साथ ही देखील फार महत्त्वाची आहे. समाजामध्ये ज्या चांगल्या गोष्टींचे परिवर्तन झाले आहे, त्यामध्ये नाटक, एकांकिका, पथनाट्य, लघुनाट्य, मूकनाट्य या नाटकाच्या विविध अंगांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे.
पूर्वीच्या काळामध्ये तर समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी नाटकाचा खूप उपयोग होत असे आणि अशाच नाटकाचे प्रयोग पाहण्यासाठी प्रेक्षकवर्ग ही उत्साहाने नाट्यगृहात यायचा. तर मधल्या काळामध्ये लोकांच्या वाढत्या अपेक्षा त्यातून निर्माण होणारे नैराश्य ताण तणाव थकवा या सर्व गोष्टींची औषध सुद्धा नाटक नावाच्या दवाखान्यात मिळत असे म्हणजेच ताण तणाव दूर करण्यासाठी एखादे मनोरंजन करणारे नाटक पाहून आपल्या चेहऱ्यावर स्मितहास्य आले की समजावं आपल्याला ताण-तणावाचे औषध मिळालं आहे, आणि म्हणूनच काय तर रंगमंचावरती कॉमेडी नाटकाचा प्रयोग हाउसफुल व्हायचा..
रंगमंचावर सादर होणाऱ्या नाटकाचे वेगवेगळे प्रयोग पाहिल्यानंतर प्रेक्षक भारावून जात असे. त्यातून कलाकारांच्या आणि रसिक प्रेक्षकांच्या हळूहळू असे लक्षात येऊ लागले की नाटक ही जीवन समृद्ध करणारी कला आहे. नाटकामुळे समाजात प्रबोधन तर होतेच पण त्या अगोदर नाटकामध्ये काम करणाऱ्या कलाकारापासून ते नाटक पाहणाऱ्या रसिक प्रेक्षकांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. कितीही मोठं दुःख असलं तरी त्याला बाजूला सरकवून यशाच्या मार्गावरती चालायला नाटक शिकवतो. कितीही मोठा समज-गैरसमज निर्माण झाला असला तरी तो बाजूला सारून एखादं नातं किती महत्त्वाचं आहे. त्या समज, गैरसमजांपेक्षा या गोष्टींची ओळख सुद्धा नाटक करून देत. या सर्व गोष्टींमुळे रसिक प्रेक्षकांनी वेगवेगळ्या नाटकांना भरभरून दाद दिली. एखाद्या गोष्टीचा अविष्कार जेवढा तारक असतो त्याच तुलनेत तो मारक देखील ठरू शकतो, कारण रंगमंचावर नाटकाचे प्रयोग सादर करणाऱ्या कलाकारांनी आपला प्रवास हळूहळू मोबाईल वरती असणाऱ्या tiktok रील्स या गोष्टींकडे वळवला आणि नाट्यगृहाच्या बाहेरची गर्दी हळुवार कमी होऊ लागली. कोणत्याही विषयावर एखादी रिल्स करायची आणि झटपट लोकप्रिय व्हायचं हा दृष्टिकोन समोर ठेवून रिल्स बनवल्या जातात. मग समाजामध्ये त्याचा कितीही दुष्परिणाम होऊ दे याचीदेखील परवा करायची नाही. समाज व्यवस्थेचं काही का होईना फक्त आपण लोकप्रिय झालो पाहिजे हाच काही लोकांचा दृष्टिकोन समाज व्यवस्थेस मारक ठरू शकतो. अर्थात मोबाईल वरती ज्या रील्स बनवल्या जातात त्या सर्व चुकीच्या आहेत असं माझं अजिबात मत नाही.

परंतु नाटकामध्ये कोणत्याही विषयाची हाताळणी अभ्यासात्मक असते त्या तुलनेत रिल्समध्ये पहायला मिळत नाही नाटकामध्ये एखादा कलाकार ती भूमिका करण्यासाठी जी मेहनत घेतो त्यातून त्या कलाकाराला नाटक सादर झाल्यानंतर जर तुम्ही विचारलं की काय रे… या नाटकातून तुला काय मिळालं तर तो कलाकार लगेच सांगतो की या नाटकाच्या प्रयोगातून मला समाधान मिळालं. त्यावेळेस मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की हे समाधान नेमकं काय असतं अर्थात त्यासाठी आपल्याला एखादी भूमिका रंगमंचावर साकारावीच लागेल. तेव्हाच त्या समाधानाची व्याख्या आपल्या लक्षात येईल. मग प्रश्न हाच निर्माण होतो की हे समाधान रिल्स करणाऱ्या कलाकारांना मिळतं का??
रिल्स टिक टॉक, वेब सिरीज या आत्ताच्या गर्दीच्या जगामध्ये कॉलेजच्या युथ फेस्टिवलची तयारी करणारी मुलं-मुली तसेच वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धेची तयारी करणारे कलाकार व राज्य नाट्य स्पर्धेच्या आखाड्यात उतरणारे रंगकर्मी यांच्याकडे पाहिलं की रंगभूमीचं भविष्य खूप मोठा आहे याची जाणीव होते. युथ फेस्टिवल मध्ये आपली एकांकिका (नाटक) सर्वोत्तम झाले पाहिजे यासाठी तहानभूक विसरून कॉलेजची मुलं धडपडत असतात, कॉलेज जीवनामध्ये डोक्यावरच्या केसांचा भांग जरा देखील विस्कटून न देणारी मुलं-मुली या एकांकिका (नाटकांमध्ये) सहभाग घेतात, तेव्हा नाटकासाठी लागणार साहित्य आपल्या डोक्यावरती घेऊन कॉलेजच्या संपूर्ण परिसरामध्ये फिरतात तेव्हा लक्षात येऊ लागतं की नाटक माणूस घडवत ते…
तर एकांकिका स्पर्धेला जाताना कलाकारांची आर्थिकदृष्ट्या जी तारेवरची कसरत होते आणि त्यातून ते कलाकार मार्ग काढतात त्यावेळी जाणवतं की नाटकामुळे माणसाचं आयुष्य समृद्ध होतं.
मग राज्य नाट्य स्पर्धेची तयारी सुरू होती आणि प्रत्येक रंगकर्मी उत्साहाने नाटकाची तालीम सुरू करू लागतो नवा दिवस, नवं नाटक, नवी भूमिका, याच विश्वासाने प्रत्येक रंगकर्मी कामाला लागतो आणि त्याच दरम्यान बहुतांशी रंगकर्मींच्या जीवनामध्ये कौटुंबिक वेगवेगळे कलह सुरू होतात. व त्यातून सुद्धा प्रत्येक रंगकर्मी जबाबदारीने मार्ग काढतो. आलेलं प्रत्येक संकट धुडकावून लावतो तेव्हा असं लक्षात येऊ लागतं की विष्णुदास भावे यांच्या नाट्य पंढरीतील हेच ते खरे रंग पंढरीचे वारकरी आहेत.
नाटक घडत राहो…

राहुल जगताप
लेखक/रंगकर्मी
7972807004







































































