Last Updated on 12 Feb 2023 5:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मयत वारिसे यांच्या मुलाला कायम स्वरूपाची नोकरी देण्याची जबाबदारीही स्वीकारली
रत्नागिरी ।
शिंदे-फडणवीस सरकारच्या वतीने मृत पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबियांना 25 लाखांची आर्थिक मदत केली जाणार आहे.याबाबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली.
शशिकांत वारीसे यांची हत्या करण्यात आली होती.त्यांच्या हत्येनंतर आरोपीला अटक केली. त्यानंतर महाराष्ट्रातील पत्रकारांनी,रत्नागिरीतील स्थानिक पत्रकारांनी आणि सर्वसामान्य जनतेने मृत पत्रकाराच्या कुटुंबियांना महाराष्ट्र सरकारकडून आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती.पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबातील त्यांचा एक मुलगा आणि आजी यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.
रत्नागिरीत रविवारी रोजगार महामेळाव्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत येथील पत्रकारांनीही पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी,ही मागणी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पुन्हा मांडली.पत्रकारांच्या या मागणीची दखल घेत मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली.या चर्चेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख व इतर माध्यमातून 15 लाख अशी मदत मयत पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.याची घोषणा पालकमंत्री श्री.सामंत यांनी आज येथे केली.
याशिवाय वारिसे यांच्या मुलाला कायमची नोकरी देण्याची जबाबदारीही श्री.सामंत यांनी स्वीकारली आहे.
मृत पत्रकार शशिकांच वारीसे यांच्या पूत्र सध्या आयटीआयचे शिक्षण घेत आहेत.भविष्यात त्यांच्या मुलाला नोकरीची गरज आणि पुढे शिक्षण करावेसे वाटले तर त्याचा सगळा खर्च मी पालकमंत्री म्हणून करीन, असेही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.










































































