Last Updated on 08 Dec 2024 6:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मंत्रिमंडळ विस्तारात आता कोणाला काय मिळणार याची उत्सुकता
मुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शपथविधी सोहळा नुकताच संपन्न झाला. यानंतर आता खातेवाटपात कोणाला काय मिळणार याची उत्सुकता आहे. ११ किंवा १२ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. त्यात भाजप मित्रपक्षांना किती स्थान आणि मान देणार याकडे लक्ष आहे. एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात भाजपचे १०, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी ९ मंत्री होते. आता नव्या मंत्रिमंडळात भाजपचे २० ते २२ मंत्री असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादीला किती मंत्रिपदं मिळणार याची उत्सुकता आहे.
मुख्यमंत्रिपदाचा त्याग करणारे एकनाथ शिंदे गृह मंत्रालयासाठी आग्रही आहेत. त्यासाठी शिवसेनेकडून बराच जोर लावला जात आहे. पण या मंत्रालयांवर भाजपची नजर आहे. त्यामुळे हा विभाग भाजपकडे जाण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्रिपद आणि उपमुख्यमंत्रिपदाची बदल झालेली आहे. मग आधीच्या उपमुख्यमंत्र्यांकडे असलेली खातीही आताच्या उपमुख्यमंत्र्यांना मिळावीत, अशी शिवसेनेची मागणी आहे. शिंदे मुख्यमंत्री असताना फडणवीस यांच्याकडे गृह मंत्रिपदाचा कार्यभार होता. आता शिंद यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद आल्यानं त्यांना गृहमंत्रिपद दिलं जावं, यासाठी सेना आग्रही आहे. गृह मंत्रालयाची मागणी करताना शिवसेनेकडून युती सरकारच्या काळातील फॉर्म्युल्याची आठवण करुन दिली जात आहे. १९९५ मध्ये राज्यात पहिल्यांदा शिवसेना-भाजप
युतीचं सरकार आलं. त्यावेळी सेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. तर उपमुख्यमंत्रिपद भाजपच्या गोपीनाथ मुंडेंकडे गेलं. मुंडे यांच्याचकडे गृहमंत्रिपद होतं. त्याच युती पॅटर्नचं स्मरण सेनेकडून करुन दिलं जात आहे. आघाडी सरकारच्या काळातही कायम उपमुख्यमंत्री असलेल्या पक्षाच्या नेत्याकडेच गृह विभाग राहिला. काँग्रेसचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांनी गृह विभाग सांभाळला. काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर गृहची जबाबदारी राष्ट्रवादीचे आर. आर. पाटील गृहमंत्री होते. काँग्रेसच्या अशोक चव्हाणांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतल्यावर जयंत पाटील गृह मंत्री झाले.
त्यानंतर काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यावर राष्ट्रवादीचे आर. आर. पाटील यांच्याकडे गृह मंत्रालयाचा कार्यभार होता. युती, आघाडीच्या काळात कधीच मुख्यमंत्री असलेल्या पक्षाकडे गृह मंत्रालयाचा कार्यभार राहिलेला नाही. पण २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हा पायंडा मोडला. त्यांनी मुख्यमंत्रिपदासह गृह मंत्रालय स्वत:कडे ठेवलं. पाच वर्षे त्यांच्याकडेच गृह मंत्रालयाची जबाबदारी राहिली. आताही भाजप तोच पॅटर्न राबवण्याच्या तयारीत आहे. तसं झाल्यास भाजप सेनेला जास्त वरचढ ठरेल.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 04 May 2026 3:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit सिसिलिया कार्व्हालो, विवेकानंद गोपाल, सुरेंद्र दरेकर, रणधीर शिंदे, अनंत कदम यांचा समावेश ईश्वरपूर । राज्याचे माजी मंत्र... Read more
शिंदेंपुढे तीन खात्यांचा पर्याय
एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रालय मिळावे, यासाठी आग्रह धरला आहे. मात्र, गृहखात्याच्या बदल्यात एकनाथ शिंदे यांच्यासमोर भाजपने महसूल, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम खाते असे ३ पर्याय ठेवले आहेत. गृहखात्याइतकेच महत्त्वाचे खाते मिळवण्यासाठी शिवसेना आग्रही असल्याचे समजते.
महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्यसंख्या २८८ असून, मंत्र्यांची संख्या ही २८८ च्या १५ टक्के अर्थात ४३ असते. त्यामुळे मंत्रिमंडळात जास्तीत जास्त ४३ मंत्री होऊ शकतात. त्यातील किती कॅबिनेट मंत्री व किती राज्यमंत्री करायचे, याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती असतो.
दरम्यान, राज्यातील नव्या सरकारच्या शपथविधीनंतर आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे वेध लागले असून, संख्याबळानुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १०, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ७ कॅबिनेट खाती देण्याबाबत विचार सुरू असल्याचे समजते. भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आल्याने त्यांचा मंत्रिमंडळातील वाटाही तेवढाच मोठा असण्याचे संकेत आहेत.










































































