Last Updated on 11 Feb 2023 5:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अश्विन-जडेजासमोर ऑस्ट्रेलियाचे ‘घालीन लोटांगण’
नागपूर ।
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्याच दिवशी भारताने जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीच्या जोरावर सामना 132 धावांनी जिंकला.या विजयासोबतच भारताची या कसोटी मालिकेत विजयी सुरुवात झाली आहे.भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे पार पडला.पाच दिवसांचा कसोटी सामना भारताने तिसऱ्याच दिवशी खिशात घातला.
पहिल्या डावात 177 धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 91 धावांवर संपुष्ठात आला. कसोटीत भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा हा दुसऱ्या क्रमांकाचा निच्चांकी स्कोअर आहे. याआधी 1981 साली मेलबर्न मैदानावर भारताने ऑस्ट्रेलियाचा 81 धावांवर ऑलआउट केला होता.
नागपूर कसोटीत पहिल्या डावात कर्णधार रोहित शर्माच्या शतकी आणि रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 400 धावा केल्या होत्या. या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत 1-0 अशी आघाडी देखील घेतली आहे.
दरम्यान, भारताकडून रवींद्र जडेजाने दोन्ही डाव मिळून 7 तर आर अश्विनने 8 विकेट्स घेतल्या. याशिवाय कर्णधार रोहित शर्माने 120 व अक्षर पटेलने 84 आणि रवींद्र जडेजा याने 70 धावा केल्या. तसेच ऑस्ट्रेलियाचा युवा फिरकीपटू टॉड मर्फीने एका डावात 7 विकेट्स घेत चांगली कामगिरी केली. मात्र, त्यानंतर सुद्धा भारताने मोठ्या फरकाने विजय मिळवला.
विजय भारताचा, चर्चा फक्त मोहम्मद शमीची

भारताच्या डावात शमी १०व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता.त्याने अक्षर पटेल सोबत संघाला 400 धावांपर्यंत पोहोचवण्यात मदत केली. शमीने 47 चेंडूत 37 धावा केल्या. या खेळीत शमीने 3 षटकार मारले, हे तिनही षटकार त्याने पदार्पण करणाऱ्या टॉड मर्फीच्या विरुद्ध मारले.शमीच्या या 3 षटकारामुळे कसोटी क्रिकेटमधील त्याच्या षटकारांची संख्या 25 इतकी झाली आहे.
कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यापासून भारत दोन पावले दूर
या सामन्यातील विजयानंतर टीम इंडियाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत वाढ केली आहे. तो आता अंतिम फेरीत प्रवेश करण्यापासून दोन पावले दूर आहे.रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला अद्याप अंतिम फेरीतील स्थान निश्चित करता आलेले नाही. मालिकेत आघाडी घेतल्यानंतर त्यांनी गुणतालिकेत आपले स्थान मजबूत केले आहे. मालिकेपूर्वी भारत 58.93 टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.तो अजूनही दुसऱ्या स्थानावर आहे, परंतु टक्केवारीने वाढला आहे.भारताचा गुण आता 61.67 टक्के आहे, जो तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेपेक्षा (53.33) जास्त आहे.दुसरीकडे, फायनलमध्ये जाण्यासाठी ऑस्ट्रेलियाला मालिकेत विजय आवश्यक आहे. पराभवानंतरही तो गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे, मात्र त्याची टक्केवारी घसरली आहे.कांगारू संघाचे टक्केवारीचे गुण 75.56 टक्क्यांवरून 70.83 टक्क्यांवर घसरले आहेत.
अंतिम फेरी गाठण्यासाठी समीकरणे काय आहेत ?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चारपैकी किमान तीन सामने जिंकावे लागतील. त्याने एक सामना जिंकला आहे. आता तो दोन विजयांसह अंतिम फेरीत पोहोचू शकतो. टीम इंडियाने मालिकेत तीनपेक्षा कमी कसोटी जिंकल्या तर अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता कायम असली तरी अडचणी वाढतील. त्यानंतर त्याला श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघ पहिल्या स्थानावर कसा पोहोचेल?
जर टीम इंडियाने मालिका 2-0 ने जिंकली (भारताने दोन सामने जिंकले आणि दोन सामने अनिर्णित राहिले)
जर टीम इंडियाने मालिका 3-1 ने जिंकली (भारताने तीन सामने जिंकले आणि ऑस्ट्रेलियाने एक)
जर टीम इंडियाने मालिका 4-0 ने जिंकली (भारताने सर्व चार सामने जिंकले)
जर टीम इंडियाने मालिका 3-0 ने जिंकली (भारताने तीन सामने जिंकले आणि एक अनिर्णित राहिला)










































































