Last Updated on 08 Sep 2023 7:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली | चांद्रयान-3 व आदित्य एल-1 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रो लवकरच अंतराळात भारताचे वेगळे स्पेस स्टेशन बनवण्याची मोहीम हाती घेणार आहे.सध्या अंतराळात एक इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे,ज्याला 15 देशांनी मिळून बनवले होते.त्यानंतर चीनने स्वतःचे वेगळे स्पेस स्टेशन प्रस्थापित केले.इस्रोची मोहीम पूर्ण झाल्यानंतर भारताचे स्पेस स्टेशन हे तिसरे असणार आहे.
इस्रोचं संपूर्ण लक्ष सध्या आदित्य आणि गगनयान मोहिमांकडे आहे.आदित्य ही भारताची पहिली सौर मोहीम आहे.तर,गगनयान या मोहिमेच्या माध्यमातून भारत पहिल्यांदाच अवकाशात मानव पाठवणार आहे.या मोहिमांनंतर इस्रो एक अतिशय मोठा प्रोजेक्ट हाती घेणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन हे तब्बल 450 टन वजनाचे आहे,तर चीनचे स्पेस स्टेशन 80 टन वजनाचे आहे.इस्रो जे स्पेस स्टेशन बनवेल ते सुमारे 20 टन वजनाचे असणार आहे.यामध्ये एका वेळी चार ते पाच अंतराळवीर राहू शकतील.पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 400 किलोमीटर उंचीवर असणाऱ्या LEO कक्षेमध्ये हे स्पेस स्टेशन प्रस्थापित केले जाईल.
अमेरिका भारतीय अंतराळवीरांना प्रशिक्षण देणार
भारताचे अंतराळ स्थानक तयार होण्यापूर्वीच अमेरिका भारतीय अंतराळवीरांना प्रशिक्षण देईल. यासाठी नासा आणि इस्रो यांच्यात करारही झाला आहे. 2024 मध्ये भारतातील दोन अंतराळवीर देखील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाऊ शकतात. याआधी त्यांना अमेरिकेतील ह्यूस्टन येथील जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे.












































































