Last Updated on 02 Feb 2025 7:59 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ९ गडी राखून विजय, संघावर कौतुकाचा वर्षाव
क्वालालंपूर । मलेशियामध्ये क्वालालंपूर इथं झालेल्या महिलांच्या १९ वर्षाखालील टी २० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ९ गडी राखून विजय मिळवत भारतानं विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे.
प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेनं भारतासमोर ८३ धावांचं आव्हान ठेवलं. भारतीय गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाज फारशा टिकाव धरु शकल्या नाहीत.
त्रिशा गोंगाडीनं सर्वाधिक ३, वैष्णवी शर्मा, परुनिका सिसोदीया आणि आय़ुशी शुक्लानं प्रत्येकी २, तर शबनम शकीलनं १ गडी बाद केला. दक्षिण आफ्रिकेनं ठेवलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्रिशा गोंगाडीनं नाबाद ४४ तर सानिका चाळके हिनं नाबाद २६ धावा फटकावत भारताला सहज विजय मिळवून दिला.
त्रिशा गोंगाडी आजच्या सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. तसंच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमानही तिला मिळाला. या यशाबद्दल भारतीय संघाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे.
Courtesy: Prasar Bharati












































































