Last Updated on 08 Feb 2022 10:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई |
देशाचा आवाज,भारतरत्न,गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज निधन झाले.त्यांनी आज सकाळी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देशाचे पंतप्रधान मोदींनी उपस्थित लावत आदरांजली वाहिली. दिदींना निरोप देण्यासाठी अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती.यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,शरद पवार, अजित पवार,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,सुप्रिया सुळे असे मोठे नेतेही उपस्थित होते.फक्त नेतेमंडळीच नाही तर बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनीही आंदरांजली वाहण्यासाठी उपस्थिती लावली होती.लतादीदी यांना निरोप देण्यासाठी अलोट गर्दी शिवाजी पार्क परिसरात पाहायला मिळाली.
त्याचबोरबर छगन भुजबळ,दिलीप वळसे पाटील सुभाष देसाई हे मंत्रीही अंत्यस्काराला आलेले दिसून आले. राज ठाकरेही परिवारासह उपस्थित होते. फक्त राज्यातील मंत्रीच नाही तर केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी हजेरी लावत आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूला देवेंद्र फडणवीस बसले होते मात्र मुख्यमंत्र्यांना बघताचं फडणवीस उठले आणि मुख्यमंत्र्यांना मोदींशेजारी जागा दिली. सारा देश सध्या दिदींच्या जाण्याने शोकसागरात बुडाला आहे.

फुलाने सजवलेल्या लष्काराच्या वाहनातून निवासस्थान प्रभूकुंज ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) पर्यंत दीदींची अंत्ययात्रा निघाली. शिवाजी पार्क येथे लता दीदींना तिन्ही दलाच्या सैन्यांकडून अखेरची मानवंदना देण्यात आली.भारतरत्न लता दीदींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लता दीदी यांचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी लता मंगेशकर यांना मंत्राग्नी दिला. भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी लतादिदींना मुखाग्नी दिली.त्यानंतरच्या विधी हृदयनाथ यांच्या मुलाने आदिनाथ मंगेशकरांनी केले.







भारतरत्न लता मंगेशकर यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सायंकाळी मुंबईत दाखल झाले. शिवाजी पार्कात पंतप्रधानांनी लता दीदींचे अंतिम दर्शन घेत मंगेशकर कुटुंबियांची वैयक्तिक भेट घेत सांत्वन केले, यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हेसुद्धा उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी,राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून यावेळी लतादीदींना पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, आमदार सुनील प्रभू,मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त इकबाल सिंह-चहल आदींनी देखील लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.
फक्त नेतेमंडळीच नाही तर बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनीही आंदरांजली वाहण्यासाठी उपस्थिती लावली होती.यावेळी लेखक-गीतकार जावेद अख्तर, गायिका अनुराधा पौडवाल, अभिनेता शाहरुख खान,अमीर खान,रणबीर कपूर,गायक शंकर महादेवन, तसेच चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी आदरांजली वाहिली.यावेळी भारतरत्न सचिन तेंडूलकरही यांनीही हजेरी लावत आदरांजली वाहिली.
राज्य सरकारने दुखवटा जाहीर केला आहे. त्यानिमित्ताने उद्या सोमवार 7 फेब्रुवारी रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही राजकीय दुखवटा जाहीर केल्याने दोन दिवस सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच मंत्रालयावरील तिरंगा झेंडा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. तसेच संसदेसह देशभरातील विधानसभा, मंत्रालये, सचिवालये आणि सरकारी कार्यालयांवरील तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे.












































































