Last Updated on 24 Aug 2023 10:12 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा परिणाम येत्या सत्र 2024 पासून बोर्डाच्या परीक्षांवर पूर्णपणे दिसून येईल.त्यानुसार आता वर्षभरात दोन बोर्डाच्या परीक्षा होणार आहेत.नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) नवीन अभ्यासक्रमाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाने दिली आहे. आता 2024 च्या शैक्षणिक सत्रासाठी पाठ्यपुस्तके तयार केली जाणार आहे.
शिक्षणासाठी नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे.यानुसार विद्यार्थ्यांच्या वर्षातून दोनवेळा बोर्डाची परीक्षा देता येणार आहे. तसेच अकरावी आणि बारावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता विषय निवडीचे देखील स्वातंत्र्य असणार आहे.या विद्यार्थ्यांन दोन भाषांचा अभ्यास करता येईल. यामध्ये एक भारतीय भाषा असेल. यासाठी नवा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकेदेखील तयार केली जात आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बुधवारी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी एक नवीन अभ्यासक्रम प्रणाली जारी केली. आता बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील. या नव्या शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांमधील समज आणि कौशल्ये विकसित होतील.तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या दोन संधी मिळतील,असे मंत्रालयाने म्हटले आहे.असे नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत हे बदल करण्यात आले आहेत.
कस्तुरीरंगन यांच्या मार्गदर्शनाखाली, सुकाणू समितीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अभ्यासक्रम तयार केला असून तो सरकारला सादर केला आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण व्यवस्थेत करावयाच्या बदलांच्या घोषणेद्वारे 2024 शैक्षणिक सत्रासाठी पुस्तके विकसित करण्याची माहिती देण्यात आली आहे. नवीन अभ्यासक्रम आराखडा शिक्षण मंत्रालयाने जाहीर केला आहे.
काय आहे बदल
दहावी,बारावी बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षापासून बोर्डाच्या परीक्षेत मोठे बदल होणार आहेत. हा बदल लक्षात घेऊनच अभ्यासक्रमाची आखणी आगामी शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी करण्यात येत आहे.त्यानंतर ही पाठ्यपुस्तके येणार आहेत.नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम तयार केला जात आहे. या बदलामुळे विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा देता येणार आहे. तसेच या परीक्षेतील सर्वोत्तम गुण निवडण्याची संधी विद्यार्थ्यांकडे असेल.
अशी असेल रचना
नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाची रचना बदल करण्यात आली आहे.नव्या धोरणात 5-3-3-4 अशी तयार केली गेली आहे.म्हणजेच तीन ते आठ वय असणारे पहिल्या पाच गटात,त्यानंतर आठ ते 11 वय असणारे दुसऱ्या तीनच्या गटात,11 ते 14 वय असणारे तिसऱ्या तीनच्या गटात तर आणि 14 ते 18 असे वयोगटानुसार शेवटचा चारचा गट आहे.






































































