Last Updated on 17 Mar 2026 8:08 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर ।
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चळवळीतील मराठी भाषिकांच्या आवाज मध्यवर्ती तसेच शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिपक अर्जुनराव दळवी यांचे आज निधन झाले. मराठी भाषिक चळवळीचे केंद्र असलेल्या बेळगांव येथे टिळकवाडीतील रहात्या घरी वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एकीकरण समीतीची अपरिमित हानी झाली असून सीमाभाग दुखःसागरात बुडाला आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
दिवंगत दीपक दळवी यांनी आयुष्यभर सीमाभागातील मराठी जनतेच्या हक्कांसाठी निःस्वार्थपणे संघर्ष केला. त्यांच्या नेतृत्वाखाली समितीला नवे बळ आणि दिशा मिळाली. ठाम भूमिका, संयमी स्वभाव आणि कार्यकर्त्यांप्रती असलेले आपुलकीचे नाते यामुळे ते सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून होते. त्यांच्या जाण्याने सीमालढ्याला मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
मराठी अस्मिता, हक्क आणि स्वाभिमानासाठी त्यांनी आयुष्यभर निर्भीडपणे लढा दिला. सीमावर्ती भागातील मराठी बांधवांच्या न्यायासाठी त्यांचा आवाज सदैव ठाम, प्रखर आणि प्रेरणादायी राहिला. त्यांच्या जाण्याने एक विचार, एक चळवळ आणि एक प्रेरणादायी नेता आपण गमावला आहे.












































































