Last Updated on 13 Jan 2022 10:03 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली :
सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील बहे येथील जाधव-पाटील भाऊपण्याच्यावतीने दरवर्षी शाकंभरी पौर्णिमेला अनोखा उत्सव साजरा केला जातो. गेल्या चार-पाचशे वर्षापासून चामुंडा देवीला वाजत गाजत नेवैद्य नेणेची प्रथा रुढ आहे.
प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बहे (ता. वाळवा) गावात दर शाकंभरी पौर्णिमेला हा अनोखा उत्सव साजरा केला जातो. चौंडेश्वरी मंदिरातील चामुंडा देवीच्या पायापाशी विधिवत पूजा करुन मोग्यातील अंबील देवीला अर्पण नमस्कार करुन देवीचा आशिर्वाद घेण्याची प्रथा पिढ्यांपिढ्या चालत आली आहे.
सुमारे चार-पाचशे वर्षापूर्वी जाधव-पाटील यांचे पूर्वज हे पैठणहून बहे गावी आले.तेथेच ते स्थायिक झाले.गावात जाधव-पाटील यांच्या दोन भावक्या,पैकी निम्मी जमीन जाधव-पाटील यांच्या एका भावकीला आली,त्यामुळे त्यांना अर्धले पाटील असेही संबोधण्यात येते.या अर्धले पाटील भावकीत फार वर्षापूर्वी संतती वाढत नव्हती अशी अख्यायिका आहे.तेंव्हा पुर्वजांनी गावातील या चामुंडा देवीला शाकंभरी पौर्णिमेला खास नैवेद्य अर्पण करण्याचा नवस बोलला व अर्धले पाटलांची संतती वाढत गेली अशी अख्यायिका प्रसिद्ध आहे.
तेव्हापासून देवीला शाकंभरी पौर्णिमेला तिन्हीसांजच्या वेळेला वाजत गाजत कणकीच्या मंद दिव्यांच्या प्रकाशासह नैवेद्य नेण्याची प्रथा रुढ आहे.चामुंडा देवीचा खास नैवेद्य म्हणजे आंबील,घुगर्या व 21 भाज्यांची मिक्स भाजी असा आहे.त्याचप्रमाणे राळ्याच्या तांदळाचे दिवे व तांबीट व बाजरीचे उंडे याचेही खूप महत्त्व आहे.घरात जितकी पुरुष मंडळी व मुले असतील तितके मोगे घेऊन ते रंगवून त्यात आंबील भरली जाते व सर्व घरातील लोक एकत्र येवून संध्याकाळच्या वेळी वाजत-गाजत हे मोगे चौंडेश्वरी देवीजवळ नेले जातात.यावेळी देवीच्या पायांवर ही आंबील घालून नमस्कार केल्याने संततीला दिर्घायुष्य प्राप्त होते अशी समजूत आहे.
प्रत्येक पौष पौर्णिमेला पिढ्यांपिढ्या चालत आलेली ही परंपरा आजही बहे गावातील लोक त्याच उत्साहाने पार पाडतात.पारंपारिक पद्धतीने सजवलेले मोगे खूप छान दिसतात, यालाच केळ्या असे म्हणतात.अर्धले पाटलांच्यात एखादे मुल जन्माला आल्यास एक केळी वाढवली जाते म्हणजेच एक मोगा वाढतो व एखादी व्यक्ती मयत झाल्यास एक मोगा कमी केला जातो.अशी ही पिढ्यांपिढ्या चालत आलेली परंपरा आजही उत्साहात साजरी केली जाते.












































































