Last Updated on 01 Mar 2023 12:15 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । सद्याच्या स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करायचे असेल तर बहुभाषिक होणे नितांत गरजेचे आहे,असे प्रतिपादन गोवेली येथील जीवनदीप कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. हरेंद्र सोष्टे यांनी केले.
मुंबई,परळ येथील महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी कला आणि वाणिज्य रात्र महाविद्यालयात ते बोलत होते.२७ फेब्रुवारी कवी कुसुमाग्रज जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त ‘मराठी भाषा आणि वाड.मय मंडळाच्या’ वतीने ‘मराठी भाषा आणि व्यवसायाच्या संधी’ या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीपकुमार कांबळे होते.
प्रा.हरेंद्र सोष्टे म्हणाले,सद्या समाजमाध्यमांचं युग आहे आणि यात व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.पटकथा, संवाद लेखन,जाहिरात,पत्रकारिता, ब्लॉग लेखन,रेडिओ जॉकी तसेच प्रकाशन व्यवसायातही आपलं करियर करू शकता.फक्त त्यासाठी आपण डोळसपणे पाहण्याची गरज आहे.मराठी भाषेला खूप मोठा इतिहास आहे.त्याविषयी आपण अभिमान बाळगला पाहिजे.
यावेळी त्यांनी ‘भाषेची बलस्थाने’ व ‘ वाचन संस्कृती ‘ या विषयावरील विद्यार्थ्यांनी केलेल्या ‘स्पंदन’ भीत्तीपत्रकाचे उदघाटन केले.प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष आणि सी.ई..ओ. डॉ.सतीश केळशीकर यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दिलेल्या शुभ संदेशाचे वाचन करण्यात आले.सूत्रसंचालन प्रा.सुप्रिया शिंदे यांनी केले.तर आभार प्रा.रुपेश पाटील यांनी मानले.या कार्यक्रमाला प्राध्यापक तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.







































































