Last Updated on 07 Nov 2024 5:44 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नांदेड । लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता सुरु आहे. आचारसंहिता कालावधीत उमेदवारांकडून मतदारांना मतदान करण्याबाबत विना परवानगी बल्क एसएमएस देण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या उमेदवारांना प्रचारासाठी बल्क एसएमएस पाठवायचे आहेत, त्यांनी माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीची परवानगी घेऊनच एसएमएस पाठविण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी केले आहे.
निवडणूक आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे बल्क एसएमएस, ई-पेपर, व्हिडिओ, ऑडिओ, रेडिओ चॅनेलवरील कोणत्याही जाहिरातीला परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगीशिवाय इलेक्ट्रॉनिक्स फॉरमॅटवरील कोणतीही जाहिरात दिल्यास कारवाई केली जाईल. बल्क एसएमएसबाबत उमेदवारांच्या सर्व प्रतिनिधींसोबत उद्या दुपारी १ वाजता माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीच्यावतीने बैठक आयोजित केली आहे. तरी बल्क एसएमएस, व्हाईस सेवा पुरविणाऱ्या मेसेज एजन्सीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवनातील माध्यम कक्षात बैठकीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केले आहे.
निवडणूक दिनांकाच्या ४८ तासाच्या शांतता काळामध्ये आकाशवाणी व खाजगी चॅनलवरील निवडणूक विषयीच्या बाबींचे प्रसारण बंद करण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. तसेच मोबाईलवरील बल्क एसएमएस सेवाही या काळात बंद ठेवण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. ४८ तास आधी मोबाईलवर अशा प्रकारे आदेश आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी एसएमएस सेवा देणाऱ्या एजन्सीची असेल, यांची सर्वानी नोंद घ्यावी असेही आवाहन करण्यात आले आहे.












































































