Last Updated on 12 Feb 2022 7:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे ।
जगातील प्रसिद्ध उद्योजक,देशातील प्रसिद्ध कंपनी असलेल्या बजाज समूहाचे आधारस्तंभ राहुल बजाज यांचे निधन झाले आहे.पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.ते 83 वर्षांचे होते.त्यांना 2001 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 रोजी कलकत्ता येथे एका मारवाडी कुटुंबात झाला. व्यावसायिक असलेल्या या मारवाडी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय संपन्न होती. ते बजाज ग्रुप उद्योग समूहाचे चेअरमन व भारतीय संसदेच्या राज्यसभेचे सदस्य होते.राहुल बजाज हे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते जमनालाल बजाज यांचे नातू होते.दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टिफन कॉलेजमध्ये इकॉनॉमिक ऑनर्स केल्यानंतर राहुल बजाज यांनी 3 वर्षं बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनीमध्ये प्रशिक्षण घेतले होते.त्यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षणही घेतले होते.त्यानंतर त्यांनी 60 च्या दशकात हॉवर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीएची पदवी घेतली होती.
राहुल बजाज यांनी बजाज ऑटो कंपनीची धुरा सुमारे 50 वर्षं सांभाळली. त्यानंतर गेल्या वर्षी त्यांनी कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
राहुल बजाज यांची कारकीर्द
- राहुल बजाज हे 1965 साली बजाज ग्रुपचे चेअरमन झाले.
- 2005 साली ते चेअरमन पदावरून पायउतार झाले. त्याचे पुत्र राजीव हे बजाज ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक झाले.
- राहुल बजाज हे 2006 ते 2010 या दरम्यान राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून गेले.
- 2016 च्या फोर्ब्ज च्या जगातील श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये राहुल बजाज हे 722 व्या क्रमांकावर होते.
उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुप्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“वाणिज्य आणि उद्योग जगतासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल राहुल बजाज सदैव स्मरणात राहतील. व्यापारविश्वाच्या पलीकडे देखील त्यांना समाजसेवा करण्याची अत्यंत आवड होती. ते एक अत्यंत संभाषणचतुर व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाने मी अत्यंत दुःखी झालो आहे. बजाज यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्याप्रती मी शोकसंवेदना व्यक्त करतो. ओम शांती.”
भारतीय उद्योगांच्या विकासात भरीव योगदान देणारा देशाभिमानी उद्योजक गमावला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई |राहुल बजाज यांच्या निधनाने भारतीय उद्योगाच्या विकासात केवळ भरीव योगदान देणारा ज्येष्ठ उद्योजकच आपण गमावला नाही तर सामाजिक भान असलेला, आणि देशासमोरील समस्यांवर निर्भिडपणे आपली मते मांडणारा, तरुण उद्योजकांचा प्रेरक असा देशाभिमानी उद्योजक आपल्यातून गेला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.राहुल बजाज यांनी दुचाकी वाहनांच्या उत्पादनात देशात क्रांती आणली तसेच जगातील या क्षेत्रातील इतर कंपन्यांसमोर भारताचे आव्हान उभे केले. त्यांनी केवळ आपल्या उद्योगाचा विकास असा संकुचित विचार केला नाही तर देशातील सर्वच उद्योगांच्या समस्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी यावर स्पष्ट व निग्रही भूमिका घेतली. एक सच्चा देशभक्त उद्योजक म्हणून देशासमोरील काही समस्यांवर देखील त्यांनी भाष्य केले आणि जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे सामाजिक कार्यही उद्योजकांनी सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावी त्याचे उत्तम उदाहरण होते.राहुल बजाज हे विशेषत: उद्योजकांच्या युवा पिढीचे मार्गदर्शक होते. त्यांनी राज्य शासनाला देखील उद्योगाच्या विकासासंदर्भात वेळोवेळी महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.त्यांच्या जाण्याने निश्चितच राज्याच्या उद्योग विश्वाचे नुकसान झाले आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या श्रद्धांजलीपर संदेशात म्हणतात.
सामाजिक भान असलेला भारतीय उद्योग क्षेत्रातील पितामह हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई | बजाज उद्योग समूहाचे मानद अध्यक्ष पद्मभूषण राहुल बजाज यांच्या निधनाने सामाजिक भान असलेला भारतीय उद्योग जगतातील पितामह हरपला आहे. बजाज कंपनीच्या माध्यमातून भारताला ऑटो उद्योगात स्वतंत्र ओळख निर्माण करुन देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांचे निधन हे भारतीय सामाजिक, उद्योग क्षेत्राची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, गेल्या पाच दशकांमध्ये बजाज समूहाला नावारुपाला आणण्यात राहुल बजाज यांनी प्रचंड योगदान दिले. त्यांचा प्रदीर्घ अनुभव, ज्ञान, दूरदृष्टीचा बजाज उद्योगासह भारतीय ऑटो उद्योगाच्या विकासात मोलाचा वाटा राहिला आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात बजाज कंपनीमुळे भारताला स्वतंत्र ओळख मिळाली. स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जमनालाल बजाज यांचा देश सेवेचा वारसा त्यांनी आयुष्यभर जपला. उद्योग क्षेत्रात कार्यरत असूनही राहुल बजाज यांनी आयुष्यभर सामाजिक भान जपले. त्यांच्या दातृत्वाच्या गुणामुळे अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचे निकटचे संबंध राहिले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली असून भारताने एक महान सुपुत्र गमावला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योगपती राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
भारतीय औद्योगिक विकासाला गती देणारे व्यक्तिमत्व हरपले – जलसंपदा मंत्री जयंत पाटील
मुंबई, दि. 12 : बजाज उद्योग समूहाचे मानद अध्यक्ष राहुल बजाज यांच्या निधनामुळे भारतीय औद्योगिक विकासाला गती देणारे व्यक्तिमत्त्व हरपले आहे अशा शोकभावना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज व्यक्त केल्या आहेत.श्री. पाटील यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे की, भारतीय औद्योगिक विश्वाला विशेषतः ऑटो उद्योगाला स्वतंत्र ओळख निर्माण करुन देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि औरंगाबाद येथील उद्योग विश्वाची भरभराट करण्यात आणि या शहरांच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी विकसित केलेल्या अनेक वाहनांमुळे सामान्य माणसांच्या आशा आकांक्षां पूर्णत्वास गेल्या.भारताला स्वयंचलित दुचाकी वाहन उद्योग क्षेत्राला नव्वदच्या दशकात स्वतंत्र ओळख मिळाली. यामध्ये राहुल बजाज यांच्या नेतृत्वाखालील बजाज कंपनीचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जमनालाल बजाज यांचा देश सेवेचा वारसा जपला. त्यांनी समाजातील दुर्बल वर्गासाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांना मदतीचा हात देऊन सामाजिक भान जोपासले, असे श्री. पाटील यांनी संदेशात नमूद केले आहे.










































































