Last Updated on 24 May 2024 11:45 AM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा तीव्र होऊन बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर रविवारी सायंकाळपर्यंत तीव्र चक्रीवादळाच्या रूपात पोहोचेल,अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिली आहे. बंगालच्या उपसागरातील हे पहिले मान्सूनपूर्व चक्रीवादळ असून हिंदी महासागरातील चक्रीवादळांना नावे देण्याच्या पद्धतीनुसार त्याचे नाव ‘रेमल’ ठेवण्यात येणार आहे.
आयएमडीच्या म्हणण्यानुसार, रविवारी हे चक्रीवादळ ताशी १०२ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, मिझोराम, त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये २६-२७ मे रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.मच्छिमारांना २७ मेपर्यंत किनारपट्टीवर परत जाण्याचा आणि बंगालच्या उपसागरात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून, चक्रीवादळाची निर्मीती होत आहे. चक्रीवादळामुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.महाराष्ट्रात अवकाळी पाऊस सुरूच आहे.या पावसाचा मोठा फटका राज्याला बसला आहे. दरम्यान या पावसाची तिव्रता आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो.
या काळात राज्यात 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहू शकतात असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.दोन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. सिंधुंदु्र्ग जिल्ह्यात वादळासह झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.24 मे पर्यंत दक्षिण भारतात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. हवामान खात्याने येत्या काही दिवसात अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे.







































































