Last Updated on 07 Nov 2024 11:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । विधानसभा निवडणुकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत. आजपासून ते १४ नोव्हेंबर पर्यंत मोदींच्या सभा धुळे, नाशिक, अकोला, नांदेड, चंद्रपूर, चिमूर, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई आणि मुंबई इथं होणार आहेत.
या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी आज धुळ्यात मालेगाव रोड, महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्राजवळ पांजरापोळ गोशाळा इथं प्रधानमंत्री प्रचारसभा घेणार आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने सभेच्या काळात या भागात विनापरवाना ड्रोन उडवायला प्रतिबंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांना ८ नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. सर्वात अगोदर धुळे व नाशिक येथे सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अकोला व नांदेड येथे त्यांची सभा होईल. तर १२ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर, सोलापूर व पुणे येथे सभांचे आयोजन करण्यात आले आहे. १४ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती संभाजीनगर, मुंबई व नवी मुंबई येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. सद्यस्थितीत दहा सभांचे नियोजन करण्यात आले असले तरी यात वाढ होण्याची देखील शक्यता आहे. प्रत्येक सभा ही संबंधित जिल्हा किंवा क्षेत्रातील १५ ते २० मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करणारी असेल व तेथील सर्व उमेदवार सभास्थळी राहतील.









































































