Last Updated on 27 Mar 2024 5:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राज्यात 17 हजार 531 पोलीस शिपाई पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पाच मार्चपासून अर्ज मागविण्यात येत आहेत.सुरुवातीला अर्ज मागविण्याची अंतिम मुदत 31 मार्च होती. मात्र यामध्ये वाढ करत ही मुदत 15 एप्रिल पर्यंत करण्यात आली आहे.
पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी 31 मार्च पर्यंत अर्ज सादर करण्यासाठी Mahait यांच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. परंतु राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक संमत केले आहे. त्यासाठी उमेदवारांना लागणारे SEBC प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यामुळे सर्व उमेदवारांना अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 15 एप्रिल, 2024 पर्यंत करण्यात येत आहे.
राज्यात 9 हजार 595 पोलीस शिपाई पदे, 1 हजार 686 चालक पोलीस शिपाई पदे, 4 हजार 449 सशस्त्र पोलीस शिपाई पदे, 101 बॅंण्डसमन पदे, 1 हजार 800 कारागृह पोलींस शिपाई पदे भरली जाणार आहेत.सर्वाधिक पदे बृहन्मुंबई पोलीस दलात होणार आहे.
उमेदवारांना policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल.राज्यातील सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणार असल्याने उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रात फक्त एका घटकातच अर्ज करू शकतो.उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल.
भरती प्रक्रियेत प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येईल. त्यामध्ये किमान 50 टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून 1:10 प्रमाणात उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांनी लेखी परीक्षेत किमान 40 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. 40 टक्क्यांहून कमी गुण मिळवणारे उमेदवार अपात्र समजले जातील.
शारीरिक आणि लेखी चाचणी मधील गुणांच्या आधारे उमेदवारांची एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल.त्या उमेदवारांची मूळ कागदपत्रे पडताळणी केली जाईल. कागदपत्र पडताळणी मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार केली जाईल.त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
पोलीस भरतीच्या अर्जासाठी खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 350 रुपये शुल्क भरावे लागेल. उमेदवार दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 18 ते 28 वर्ष वयोगटातील उमेदवारांना अर्ज करता येईल.







































































