Last Updated on 05 Dec 2023 8:22 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे | दुधाचे दर कमी झाल्यामुळे सरकारने लवकरात लवकर मध्यस्थी करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी प्रादेशिक दुग्ध विकास कार्यालयावर रयत क्रांती संघटनेचा आज,मंगळवारी दुपारी १२ वाजता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली येथील प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास कार्यालयावर दूध उत्पादक शेतकऱ्यांचा कावड मोर्चा धडकला.यावेळी रयत क्रांती संघटनेचे राज्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच दूध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित कावड मोर्चामध्ये होते.

संपूर्ण राज्यात दुधाचे दर जवळजवळ आठ ते दहा रुपयांनी कमी झाले असून सध्या प्रतिलीटर २६ ते २८ रुपये दर दूध उत्पादक शेतकऱ्याला मिळत आहे. त्यामुळे दूध ऊत्पादक शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय तोट्यात आला आहे. खासगी व सहकारी दूध संघांच्या मक्तेदारीमुळे दुधाचे दर कमी झाले. सरकारने दूध दर प्रश्नी ताबडतोब मार्ग काढून संपूर्ण महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा, या हेतूने रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली आज पुणे येथे लालमहाल ते प्रादेशिक दुग्ध व्यवसाय कार्यालय पर्यंत कावड मोर्चा काढण्यात आला.
मागील जून महिन्यात ३.८/८.५ फॅट व एसएनएफ प्रतीच्या दुधाला प्रतिलीटर ३४ रुपये हमीभाव देण्यासंबंधीचा शासन निर्णय झालेला होता. परंतु दूधसंघ त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी न करता मनमानी पद्धतीने शेतकऱ्यांच्या दुधाला कमी दर देत संकलन करीत आहेत.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला आहे. सध्या पशुखाद्याचे दर गगनाला भिडलेले आहेत. तसेच भरडा, पशु औषधांच्या वाढलेल्या किमती व वैरणीच्या तुटवड्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे यामध्ये लक्ष घालून येत्या १५ दिवसात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलीटर ३४ एवढा हमीभाव रुपये द्यावा, सध्या दूध दर घसरल्याने शेतकऱ्यांना प्रतीलिटर ५ रुपये अनुदान मिळावे,अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी कावड मोर्चाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केली आहे.










































































