Last Updated on 10 Jul 2023 7:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पावसाळा सुरु झाला आहे.साहजिकच सर्वांना पावसात भिजायला आवडते.परंतु या सुखद अनुभवासोबतच आपण वेगवेगळे आजार घेऊन येतो.तसेच हे वातावरण जीवजंतूसाठी पोषक असते.त्यामुळे जंतूसंसर्ग होऊन साथीचे आजार लवकर पसरतात.पावसाळ्यात विविध डासांचा प्रसार होतो.त्यामुळे पावसाळ्यात दवाखाने नेहमी हाऊसफुल्ल झाल्याचे आपण पाहतो.पावसाळ्यातील आजार टाळण्यासाठी स्वच्छता आणि त्यासोबत विविध बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे.
पावसाळ्यातील आजार
- हिवताप, मलेरिया : पावसाळ्यात प्रामुख्याने डास चावल्यामुळे हिवताप किंवा मलेरिया होतो. एनॉफिलीस जातीच्या मच्छराने दंश केल्यास हिवतापाची लागण लगेच होते.
- सर्दी, खोकला : अंगावर ओले कपडे जास्त वेळ, पावसात भिजणे यांमुळे सर्दी खोकल्यासारखे किरकोळ आजार उद्भवतात.
- दमा : ढगाळ वातावरणामुळे पावसाळ्यात दमा असणाऱ्या रुग्णांना त्रास जास्त जाणवतो. दमट, गार हवा आणि मंद पचनशक्ती यामुळे दम्याचा त्रास वाढतो.
- जुलाब : पावसाळ्यात पाण्याची प्रदुषण जास्त होते. त्यामुळे जुलबा आजार उद्भवण्याची शक्यता असते.
- पायाला चिखल्या होणे : पावसात जास्त वेळ भिजल्यास किंवा ओली चप्पल पायात जास्त वेळ ठेवल्यास चिखल्या होतात.
पावसाळ्यात घ्यावयाची काळजी जलजन्य आजाराबाबत घ्यावयाची काळजी
• शिळे आणि उघड्यावरील अन्न खाऊ नका.
• घरात आणि घटाभोवती माशा होऊ नयेत यासाठी स्वच्छता ठेवा.
• साथीच्या काळात पिण्याचे पाणी उकळून गार करून प्या.
• लहान मुले आणि गरोदर माता यांना पिण्याचे पाणी उकळून गार केलेले द्या.
• पिण्याच्या पाण्याबाबत योग्य काळजी घ्या.
• आपल्या गावातील परिसरातील पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण नियमित होते आहे ना याबाबत खातरजमा करा.
• ज्या ठिकाणी स्वच्छता पाळली जात नाही अशा हॉटेल किंवा इतर ठिकाणी खाणे, पाणी पिणे टाळा. बाहेरील बर्फ खाणे टाळा.
• घराबाहेर पडताना प्रवासात आपल्या सोबत पाणी ठेवा, जेणे करून कुठलेही पाणी पिण्याची वेळ येणार नाही.
आहार विषयक काळजी :
पावसाळ्यात पचन न होणारा आहार घेतल्यास शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते. त्यासाठी थंड पदार्थ, तेलकट पदार्थ, फास्ट फुड, उपवासासाठी शेंगदाणे किंवा भगर हे पदार्थ खाणे टाळावे.पचायला हलके आणि उष्ण पदार्थ शक्यतो घ्यावे.यामध्ये बेसन लाडू, टोमॅटो सुप, वांगी, भेंडवळ, कैरी, लिंबु, चिंच, सुखे खोबरे या पदार्थांचा वापर करावा.
आरोग्य विभागामार्फत पावसाळ्यातील डेंगू, मलेरिया, जापानी मेंदूज्वर, लेप्टोस्पायरोसिस अशा आजारांना नियंत्रित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहे.
आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजना
- जोखीमग्रस्त गावांची यादी तयार करण्यात आली आहे.
- गृहभेटी व आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत सर्वेक्षण व रुग्णशोध मोहीम.
- आश्रमशाळा यांना वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या मार्फत नियमित भेटी.
- पाणी गुणवत्ता नियंत्रण 76 हजार पाणी नमुने तपासण्यात आले आहेत.
- पाण्याच्या स्रोतांचा सर्व्हे व प्रत्येक गावांना हिरवे, पिवळे, लाल कार्ड देण्यात आले आहेत.
- एकात्मिक कीटक व व्यवस्थापन यात परिसर स्वच्छता, डासांचे पासून वैयक्तिक संरक्षणसाठी मच्छरदाणी, डास प्रतिबंधक क्रीम, खिडक्यांना जाळ्या बसविण्याबाबत समुपदेशन करण्यात आले
- प्रयोगशाळा सिद्धता
- पुरेसा औषध साठा
- शीघ्र प्रतिसाद पथके यांची स्थापना
- गावपातळीवर साथरोग सर्वेक्षण तसेच अंतर विभागीय समन्वय व आरोग्य शिक्षण यावरही भर देण्यात येत आहे.












































































