Last Updated on 11 Jul 2023 5:26 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अंकुश चव्हाण । अधोरेखित ऑनलाइन
मान्सून येणार,लवकर येणार म्हणून पावसाकडे वाट बघत बसलेल्या शेतकऱ्याला यंदा पावसाने हुलकावणी दिली आहे.त्यामुळे ‘पाऊस नाही डोळेच बरसले’ अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे
दरवर्षी उन्हाळ्यात वळीव हजेरी लावतो,या वळीवाने देखील शेतकऱ्याला आधार मिळतो,खरिपाच्या मशागतींना वेग येतो,काळेभोर आणि मऊ लुसलुशीत शेत नववधू सारखं सजलेले असते,पुढे मृगाची हजेरी लागते आणि पावसाळा सुरू होतो,पण मृग नक्षत्र देखील यंदा वाया गेल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.
सध्या तो हाताश झालेला आहे,मृग नक्षत्र सुरू झाले की शेतकरी राजा चाड्यावरती हात ठेवूनी बियाणे शेतीत पेरतो,मृगात पाऊस बरसतो आणि पीक तरारून उगवते,शेतकऱ्याचा आनंद गगनात मावत नाही.यंदा मात्र पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.त्यामुळे पाऊस नाही डोळेच बरसले ही स्थिती शेतकऱ्यांची झाली
हेही वाचा – शुभसंयोग : श्रावण…अधिक श्रावण मास; जाणून घ्या धार्मिक महत्त्व
दरवर्षी वैशाख महिन्यात अनेकदा वळीवाची हजेरी लागलेली असते यावर्षी मात्र अपवादानेच तो पडलेला आहे वळीवानंतर शेतकऱ्याला अपेक्षा मृगाची असते,त्यानंतर ग्रीष्म ऋतूने तापलेला सारा निसर्ग आषाढ सरींनी प्रफुल्लित होतो आणि साऱ्या सृष्टीला उल्हसित करून जातो.मात्र आषाढाला सुरुवात झाली तरीही तक्त उन्हाने पाठ सोडलेली नाही.
जमिनी भेगाळलेल्या आहेत.त्यामुळे शेतकरी चातका प्रमाणे पावसाची वाट पाहतोय मात्र त्याला पावसाने हुलकावनी दिली आहे.शेतकऱ्यांनी खरिपाची पूर्वतयारी केली आहे.मृग नक्षत्रामध्ये पाऊस हमखास येतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये पेरण्या केल्या जातात.यंदा मात्र पावसाने हुलकावणी दिली.त्यामुळे पेरण्या लांबल्याने खरीप वाया जाण्याची शक्यता आहे! त्यामुळे बळीराजा पावसाला ‘येरे येरे पावसा’ म्हणून विनवण्या करत आहे!












































































