Last Updated on 30 May 2025 7:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर | द्राक्ष हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणारे महत्वाचे फळपिक आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीपासून द्राक्ष बागांच्या संरक्षणासाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञानाचा शासकीय योजनेंतर्गत समावेश करण्याबत शेतकरी तसेच लोकप्रतिनिधींद्वारे सातत्याने मागणी होत होती. त्यास अनुसरुन राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर हा प्रकल्प प्रमुख द्राक्ष उत्पादक जिल्ह्यांमध्ये राबविण्याकरिता महाडीबीटी प्रणालीवर या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
गारपीट व अवकाळी पाऊस यापासून द्राक्ष बांगाचे संरक्षण करणे. शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या व उच्च प्रतीच्या निर्यातक्षम द्राक्ष पिकांच्या उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य करणे. फळबागांकरीता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याकरीता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, ग्रामीण भागातील युवकांना कृषी क्षेत्रात स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
द्राक्ष उत्पादक 4 जिल्हे नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, जालना, अहमदनगर व सातारा पर्यंत योजनेची व्याप्ती आहे. यामध्ये क्षेत्र मर्यादा 20 गुंठे ते 1 एकर दरम्यान प्रति लाभार्थी लाभ देय राहील. खर्चाचे मापदंड: 4 लाख 81 हजार 344 रुपये प्रती एकर व अनुदान मर्यादा 2 लाख 40 हजार 672 रुपये प्रती एकर (खर्चाच्या 50 टक्के) इतके आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, जालना, अहमदनगर व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या घटकाचा लाभ महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in/…/AgriLogin/AgriLogin या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत.
यासाठी आवश्यक कागदपत्रे अॅग्रीस्टॅक फार्मर आय डी, ७/१२ उतारा (द्राक्ष पिकाच्या नोंदीसह), ८-अ, आधार कार्डाची छायांकीत प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/ जमातीच्या शेतकऱ्यांसाठी), विहीत नमुन्यातील हमीपत्र, बंधपत्र, चतुः सीमा नकाशा आवश्यक आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी विभागाचे संकेतस्थळ http://krishi.maharashtra.gov.in किंवा जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, अशी माहिती पुणे महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, संचालक डॉ. के. पी. मोते यांनी दिली आहे.
स्रोत : जि. मा. का., कोल्हापूर







































































