Last Updated on 01 Oct 2022 2:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सुरुवातीला भारतामधील प्रमुख 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार
नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर फाईव्ह-जी (5G) सेवेचा शुभारंभ करण्यात आला.भारतासाठी हा एक विशेष क्षण होता.या माध्यमातून भारताने आता तंत्रज्ञानाच्या नव्या युगात प्रवेश केला आहे.सुरुवातीला देशातील 13 शहरांमध्ये ही सेवा मिळणार आहे.भारतामध्ये रिलायन्स जिओ आणि एअरटेलयासारख्या टेलिकॉम कंपन्यांनी याआधी दिवाळीमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे.सुरुवातीला भारतामधील प्रमुख 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात 5जी इंटरनेट सेवा लाँच करण्यात आली आहे.यामुळे आता भारतातही इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे.रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या कंपन्या स्पर्धेत आहेत.सध्या बाजारात अनेक 5G मोबाईल उपलब्ध आहेत.तर, काही कंपन्या सर्वात स्वस्त 5G मोबाईल देत आहेत. रिलायन्स जियो कंपनीने नुकताच जिओ 5G फोन लाँच केले आहेत.
देशात आज 5G इंटरनेट सुविधेला (5G Internet Service) सुरुवात होत आहे. सुरुवातीला देशातील 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यात येणार आहे. दिवाळीपर्यंत या 13 शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरु होईल. त्यानंतर हळूहळू 5G इंटरनेट सेवेचं जाळं देशभर विस्तारत जाईल. पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे आणि दिल्लीसह देशात 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यात येईल. भारतात आजपासून 5G इंटरनेट सेवा सुरु होणार असून मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, चंदीगड, गुरुग्राम, हैदराबाद, लखनौ, गांधीनगर, अहमदाबाद आणि जामनगर या 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार आहे.
5G सेवा शुभारंभ तारखेची इतिहासात नाेंद हाेईल : पंतप्रधान मोदी
यावेळी पंतप्रधान नरेंद्र माेदी म्हणाले, ‘आज देशातील दूरसंचार उद्योगाकडून 130 कोटी भारतीयांना 5G च्या रूपाने एक अद्भुत भेट मिळत आहे. 5G ही नव्या युगाची दार ठोठावत आहे, ही नव्या संधींची सुरुवात आहे. यासाठी मी प्रत्येक भारतीयाचे खूप खूप अभिनंदन करतो. भारताच्या 21 व्या शतकातील विकसनशील क्षमता पाहण्यासाठी आजचा दिवस विशेष आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षातील 1 ऑक्टोबर 2022 ही तारीख इतिहासात नोंदवली जाणार आहे.’
‘नवा भारत हा केवळ तंत्रज्ञानाचा ग्राहक राहणार नाही, तर त्या तंत्रज्ञानाच्या विकासात आणि अंमलबजावणीत सक्रीय भूमिका बजावेल. भविष्यातील वायरलेस तंत्रज्ञानाची रचना करताना, त्या संबंधित उत्पादनात भारताची मोठी भूमिका असेल. 2G, 3G, 4G च्या काळात भारत तंत्रज्ञानासाठी इतर देशांवर अवलंबून होता; पण 5G ने भारताने एक नवा इतिहास रचला आहे. 5G सह, भारत प्रथमच दूरसंचार तंत्रज्ञानामध्ये जागतिक मानक स्थापित करत आहे’, असेही पंतप्रधान माेदी म्हणाले.
वापरकर्त्यांना मिळणार ‘हे’ फायदे
5G सेवा सुरू केल्यानंतर, युजर्सचा अनुभव खूप बदलणार आहे. जसे 4G ने युजर्सचे जग क्षणार्धात बदलून टाकले होते. त्याचप्रमाणे 5G आल्यानंतर बरेच काही बदलणार आहे. इंटरनेट स्पीड दहा पट वाढवण्याचा सर्वात मोठा फायदा होईल. याचा फायदा असा होईल की बफरिंगपासून सुटका होईल. याशिवाय व्हॉट्सअॅप कॉलमधील व्यत्ययही संपणार आहे. चित्रपट 10-15 सेकंदात डाउनलोड होईल. व्हर्च्युअल रियल्टी अनेक क्षेत्रांत आपला ठसा उमटवेल. गेमिंग जग बदलेल. तसेच दुर्गम भागात शैक्षणिक सेवा आणि आरोग्य सेवा पोहोचणे सोपे होणार आहे. याशिवाय कृषी क्षेत्रात ड्रोन आदींचा वापर करणे सोपे होणार आहे. त्याचप्रमाणे Metaverse सारख्या तंत्रज्ञानाचा वापर प्रत्यक्षात होईल.









































































