Last Updated on 04 Apr 2025 2:35 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मनोज कुमार यांचं आज सकाळी मुंबई इथल्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या सकाळी अकरा वाजता शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार होणार आहेत.
देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जाणारे मनोज कुमार हे भारत कुमार या टोपणनावानेही ओळखले जात. त्यांचं मूळ नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी असं होतं. त्यांचा जन्म २४ जुलै १९३७मध्ये तत्कालीन वायव्य सिंध प्रांतातल्या एबटाबाद इथे झाला होता. वो कौन थी, शहीद, हिमालय की गोद में, गुमनाम, पत्थर के सनम, नीलकमल, रोटी कपडा और मकान, क्रांती, पूरब और पश्चिम हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत.
देशभक्त नायक म्हणून त्यांनी साकारलेल्या रुपेरी पडद्यावरच्या व्यक्तिरेखांमुळे भारतकुमार हे टोपणनाव मिळालं. भारतीय चित्रपटसृष्टीतल्या त्यांच्या योगदानामुळे त्यांना फिल्मफेअर पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मश्री सन्मानाने गौरवण्यात आलं होतं.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मनोज कुमार यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर अमिट छाप सोडली आहे. त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी देशभक्तीपर चित्रपट बनवून भारतीय मूल्यांविषयी अभिमानाची भावना जागृत केली, असं राष्ट्रपती समाजमाध्यमावरच्या आपल्या शोकसंदेशात म्हणाल्या आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मनोज कुमार हे भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांच्या देशभक्तीपर व्यक्तिरेखांसाठी ओळखले गेले. त्यांनी आपल्या अभिनय आणि चित्रपट निर्मितीच्या माध्यमातून राष्ट्राभिमानाची भावना सदैव जागृत ठेवली. ही भावना पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहिल, असं प्रधानमंत्री समाजमाध्यमावरच्या आपल्या शोकसंदेशात म्हणाले आहेत.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. देशभक्तीपर चित्रपट बनवण्यासाठी ते कायम लक्षात राहतील. त्यांचा वारसा त्यांच्या चित्रपटांमधून जिवंत राहील, असं सिंग यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी देखील मनोज कुमार यांच्या निधनाविषयी शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मनोज कुमार यांच्याविषयी शोकभावना व्यक्त केल्या आहे. मनोज कुमार यांनी त्यांच्या चित्रपटांमधून देशभक्तीचं मूल्य रुजवलं. ते खरोखरच भारत कुमार या नावाप्रमाणे जगले. त्यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीत कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे, असं फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मनोज कुमार यांच्या उपकार, रोटी कपडा और मकान आणि क्रांती यांसारक्या चित्रपटांद्वारे त्यांची अढळ राष्ट्रभक्ती प्रतीत होत असल्याची भावना आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मनोज कुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या चित्रपटातून भारताच्या स्वातंत्र्यासाठी शूरवीरांनी दिलेल्या बलिदानाची जाणीव सर्वांना करून दिली, असं पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले आहेत.










































































