Last Updated on 27 May 2025 7:49 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । जिल्ह्यातील ताकारी रेल्वे स्थानकावर पुन्हा रेल्वेगाड्यांचा नियमित थांबा सुरू करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. यासंदर्भात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला असून, फडणवीस यांनी ही मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सादर केली आहे.
कोरोनापूर्व काळापूर्वी खालील महत्त्वाच्या चार गाड्यांचा ताकारी स्थानकावर नियमित थांबा होता.
गाड्यांचा तपशील
1. 11029/11030 कोल्हापूर – मुंबई कोयना एक्सप्रेस
2. 11039/11040 कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस
3. 11021/11022 दादर – तिरुनेलवेली एक्सप्रेस
4. 11005/11006 दादर – पुदुचेरी चालुक्य एक्सप्रेस
कोरोना काळात प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत या गाड्यांचा ताकारी स्थानकावरील थांबा रद्द करण्यात आला होता. मात्र, परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतरही या गाड्यांचा थांबा अद्याप पूर्ववत करण्यात आलेला नाही. परिणामी, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि स्थानिक प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
याबाबत विविध वेळा स्थानिक नागरिक व संस्था यांच्याकडून संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदनं दिली गेली, परंतु ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळेच सदाभाऊ खोत यांनी हा विषय थेट मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत तत्काळ पावले उचलत केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांच्याकडे ताकारी रेल्वे स्थानकावर वरील गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करण्याची शिफारस केली असून, यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती केली आहे. आता यासंदर्भात पुढील स्तरावर पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे.










































































