Last Updated on 06 Jun 2023 7:31 AM by Sanjay Patil/Adhorekhit
1500 हेक्टर जागेवर टप्प्याटप्प्यात राबविणार योजना
ठाणे । आशियातील सर्वांत मोठ्या समूह विकास अर्थात क्लस्टर योजनेचा शुभारंभ सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात करण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात तब्बल दहा हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे.1500 हेक्टरवर ही महत्त्वाकांक्षी योजना आकारास येणार आहे. त्यामुळे अनधिकृत व अधिकृत असलेल्या धोकादायक तसेच अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांना भविष्यात स्वतःचे हक्काचे घर उपलब्ध होणार असल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे.
यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या सुविद्य पत्नी श्रीमती लता शिंदे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) व अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, खासदार कुमार केतकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, माजी आमदार रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर आदी उपस्थित होते. किसन नगर येथील समूह विकास योजनेच्या कामांची सुरुवात 1997 मध्ये पडलेल्या साईराज इमारतींतील रहिवासी दाम्पत्यांच्या हस्ते पूजा करून करण्यात आली. यावेळी क्लस्टर योजनेच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते झाले.
ठाण्याप्रमाणेच मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील मीराभाईंदर, कल्याण, भिवंडी आदी क्षेत्रातील अनधिकृत धोकादायक इमारतींच्या क्लस्टर योजनेचा मार्ग मोकळा केला आहे. मीरा भाईंदरमधील क्लस्टर योजना दिवाळीनंतर सुरू होईल, असेही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी सांगितले.
मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पासाठी आवश्यक तेथे नियमात बदल करून आता असे प्रकल्प शासनामार्फत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सिडको, म्हाडा, एमएमआरडीए, महाप्रित, एसआरए आणि अन्य सर्व गृहनिर्माण संस्थांची मदत घेऊन हे प्रकल्प पूर्ण करण्यात येतील, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.
यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांना जमिनीचे ताबा पत्रे देण्यात आली तर महाप्रितचे बिपीन श्रीमाळी यांना करारनामा पत्र देऊन गौरविण्यात आले. याशिवाय या योजनेसाठी सहकार्य करणाऱ्या महापालिका आयुक्त श्री. बांगर, वास्तुविशारद हाफिज कॉन्ट्रँक्टर, संजय देशमुख, विशेष सल्लागार मंगेश देसाई यांच्यासह जमिन मालकांचा मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अनधिकृत व अधिकृत धोकादायक इमारतीचा सामूहिक पुर्नविकास करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून नियमावली तयार करण्यात आली आहे. या योजनेच्या कामाची सुरूवात अंतिम भूखंड क्र. 186/187 या वरील 7753 चौ.मी क्षेत्रफळावरील भूखंडावर त्याचप्रमाणे रस्ता क्रमांक 22 लगतचा भूखंड क्रमांक एफ – 3 या ठिकाणी 19275 चौ.मी. एवढ्या जागेवर करण्यात येणार आहे. नागरी पुनरुत्थान 1 व 2 ची अंमलबजावणी सिडकोमार्फत होणार आहे. त्याचप्रमाणे समूह विकास योजनेचे कामकाज सांभाळण्यासाठी कशिश पार्क येथे क्लस्टर पुनर्विकासचे कार्यालय निर्माण करण्यात आले आहे. या प्रशस्त कार्यालयाचे उद्घाटनही मुख्यमंत्री श्री. शिंदे हस्ते झाले.












































































