Last Updated on 24 Jul 2023 6:29 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे.वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शंभराहून अधिक मराठी नाटकांमध्ये आणि 30 हून अधिक हिंदी सिनेमांत त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या आहेत.
गेल्या चार दशकांपासून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. जयंत सावरकर हे 97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. जयंत सावरकर हे रंगकर्मी असण्यासोबत मालिका,सिनेमे आणि वेबसीरिजमध्येही ते झळकले आहेत.’अपराध मीच केला’ (गोळे मास्तर), ‘अपूर्णांक’, ‘अलीबाबा चाळीस चोर’, ‘अल्लादीन जादूचा दिवा’, ‘आम्ही जगतो बेफाम’, ‘एकच प्याला’ अशी अनेक नाटके त्यांची गाजली आहेत. ‘एकच प्याला’ नाटकातील त्यांची तळीरामांची भूमिका चांगलीच गाजली आहे. विनोदीसह गंभीर भूमिकांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. काही महिन्यांपूर्वीच ‘आई कुठे काय करते’ या छोट्या पडद्यावरील मालिकेत ते दिसले होते.’समांतर’ या वेबसीरिजमध्येही त्यांनी काम केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना श्रद्धांजली
आपल्या दमदार आणि कसदार अभिनयाने रसिकांच्या मनात घर करून राहिलेला, दोन पिढ्यांना जोडणारा ज्येष्ठ रंगकर्मी आपण गमावला आहे, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.‘जयंत सावरकर यांनी नानाविध चरित्र भूमिका सहजगत्या केल्या. हसतमुख व प्रसन्न व्यक्तिमत्त्वाद्वारे त्यांनी मराठी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी मालिका या माध्यमातून आपल्या कसदार अभिनयचा ठसा उमटवला. त्यांच्या जाण्याने एक ज्येष्ठ रंगकर्मी आपण गमावला आहे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.









































































