Last Updated on 18 Jul 2023 8:59 AM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे | जेईई, नीट,एमएचटी-सीईटी- 2025 पूर्व प्रशिक्षणासाठी नव्याने अर्ज करण्याकरीता तसेच 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याबाबत तसेच आदी कागदपत्रे अपलोड करण्याकरीता विद्यार्थ्यांना 30 जुलै 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापकांनी दिली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती) नागपूर या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडून जेईई,नीट,एमएचटी-सीईटी- 2025 या परिक्षेच्या पूर्व तयारीसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षणाकरीता ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी या संवर्गातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्याकडून www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड मध्ये उपलब्ध अप्लिकेशन ट्रेनिंग या मोडवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे. संकेतस्थळावर अर्जाचा नमुना व तपशिलवार माहिती उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. टपालाद्वारे, प्रत्यक्ष किंवा मेलवर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असेही प्रकल्प व्यवस्थापकांनी कळविले आहे.
युजीसी-नेट/सीएसआयआर-नेट/एमएच-सेट परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास 30 जुलैपर्यंत मुदतवाढ
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडून युजीसी-नेट/सीएसआयआर-नेट/एमएच-सेट-2023-24 या परिक्षेच्या मोफत ऑनलाईन व ऑफलाईन पूर्व तयारीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जुलै 2023 पर्यंत वाढविण्यात आली असल्याचे महाज्योतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ओबीसी / व्हीजेएनटी / एसबीसी या संवर्गातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांकडून www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्डमधे उपलब्ध अप्लिकेशन ट्रेनिंग या मोडवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले होते. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणि त्यांच्या पुढील भवितव्याचा विचार करता महाज्योतीकडून युजीसी-नेट/सीएसआयआर-नेट/एमएच-सेट – 2023-24 परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी दिनांक 30 जुलै 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी संकेतस्थळावर अर्जाचा नमुना व तपशिलवार माहिती उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. टपालाव्दारे, प्रत्यक्ष किंवा मेल वर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाज्योतीच्या वतीने करण्यात आले आहे.






































































