Last Updated on 14 Oct 2024 1:38 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । जिल्ह्यातील स्व.पतंगराव कदम, स्व.आर.आर.पाटील, स्व.मदन पाटील, स्व.संभाजीआप्पा पवार यांच्यासारख्या दिगग्ज नेत्यांना त्रास कोणी दिला, हे येथील साऱ्या जनतेला माहित आहे. हे नेते आता हयात असते तर एक विकसित व रोल मॉडेल म्हणून सांगली जिल्हा ओळखला गेला असता. या जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेवण्याचे काम आ. जयंत पाटील यांनी केले आहे, अशी टीका भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले -पाटील यांनी केली.
कवठेपिरान येथे मिरज सर्कलमधील आठ गावातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्य व आदर्श माजी सरपंच भीमराव माने, उपसरपंच सुशांत देसाई, प्रदेश भाजपा निमंत्रित सदस्य प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, तालुकाध्यक्ष निवास पाटील, संघटन सरचिटणीस संदीप सावंत, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष मधुकर हुबाले, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रवीण माने, यादुराज थोरात, दुधगावचे सरपंच गिरीश पाटील प्रमुख उपस्थित होते.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, गेल्या ३५ वर्षात दूध, ऊस उत्पादकांचे प्रश्न सुटलेले नाहीत. या जिल्ह्यातील अनेक कारखानदारांना ३५०० रुपयांहून अधिक ऊसदर देण्याची इच्छा असून ही त्यांना अडवण्याचा प्रयत्न कोण करते ते जिल्ह्यातील जनतेला माहीत आहे. त्या प्रवृत्तीचा आता हिशोब करण्याची वेळ आली आहे. माळेगावचा सहकारी साखर कारखाना ३६३६ तर सोमेश्वरसारखा साखर कारखाना ३ हजार ५०० रुपयांपेक्षा जास्त दर देतो. तर इथल्या कारखानदारांचे व इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून मिरवणाऱ्यांना का जमत नाही. उसाला चांगला दर मिळाला तर तुमचे अर्थकारण चांगल्या सुस्थितीमध्ये येईल. म्हणूनच इथला शेतकरी समृद्ध बनला तर आपले राजकारण चालणार नाही, या भीतीपोटी ते शेतकऱ्यांची गळचेपी करत आहेत. राजकारणाचा सुसंस्कृतपणा कसा असावा हे या सांगली जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्राला शिकवले. काँग्रेस पक्षाचे तिकीट वाटप या जिल्ह्यातून माजी मुख्यमंत्री स्व.वसंतदादा पाटील करत होते. परंतु त्यांच्या नातवाची तिकिटासाठी एकदा न्हवे दोनदा तुम्ही परवड करत असाल तर तुम्ही विचार करण्याची वेळ आहे. स्व.राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर स्व.वसंतदादांनी त्यांची घरी जाऊन जयंत पाटील व त्यांच्या आईसाहेबांना सांगितले होते की, बापू आणि माझं वैर आजपासून संपलं. जयंत व प्रकाश आजपासून मला सारखे आहेत. त्याकाळी जयंत पाटलांना जनता पक्षातून काँग्रेसमध्ये आणण्याचे खऱ्या अर्थाने काम स्व.वसतदादांनी केलं होत. परंतु गेले ३५ वर्षे वसंतदादा घराण्याचे राजकीय अस्तित्व संपवण्याचे काम या व्यक्तीने केलं आहे.
भीमराव माने म्हणाले, जयंत पाटील यांचे राजकारण हे समाजहिताचे नसून स्वहित व नातेवाईक यांच्या हिताचे आहे. ३५ वर्षे ज्या जनतेने त्यांना हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, त्या जनतेची जाणीव त्यांना नाही. ही निवडणूक ऐतिहासीक होणार आहे. परिवर्तन निश्चित आहे. तुम्ही कोणाच्या दबावाला,अमिषाला बळी पडू नका, हे आमदार महाशय एवढी वेळ संधी द्या म्हणून येतील. त्यांच्या आमिषाला भुलायचं नाही. निशिकांतदादासारखा आपल्या घरातील वाटणारा, हक्काचा माणसाला साथ द्या. दादांनाही मी शब्द देतो, या आठ गावातून तुम्हाला मोठे मताधिक्य देण्याचे काम माझे राहील.
यावेळी युवा मोर्चा उपाध्यक्ष शुभम पाटील, रघुनाथ दिंडे, भानुदास पाडळे, अनिल खोत, शितल मडके, प्रताप भोसले, सर्जेराव पाटील, विपीन कुलकर्णी, प्रदीप कुंभार, बाबासाहेब संद्रे, सोमनाथ गावडे, चेतन पवार, प्रमोद डांगे, रवी पाटील, महादेव पाटील, कुमार पाटील, प्रकाश कोळी, विजय शिंदे, दिलीप कुंभार, महावीर चौगले, महेश सायमुते, कुमार मलमे, तानाजी पिंपळे, शीतल चौगले, संजय बेले, दस्तगीर मुजावर, अभिजित पाटील, विजय मसूदगे, दीपक शिरतोडे, दत्ता घेवारे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुमचे अर्थकारण सुस्थितीत आणण्याची जबाबदारी माझी…
यावेळी बोलताना निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मला आशीर्वाद द्या. तुमचे अर्थकारण सुस्थितीत आणण्याची जबाबदारी माजी असेल. येणाऱ्या काळात तुमच्या आशीर्वादाने कारखाना उभा करून उच्चांकी ऊस दर देऊन दराची कोंडी फोडण्यासाठी मी पुढाकार घेईन. तसेच कारखान्याच्या सर्व सभासदांना व ऊस घालणाऱ्या सर्व उत्पादकांना मोफत साखर देईन, असा मी यानिमित्ताने तुम्हाला शब्द देतो.










































































