Last Updated on 11 Sep 2023 8:20 AM by Sanjay Patil/Adhorekhit
कोलंबो । आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारत-पाकिस्तान संघादरम्यान कोलंबो सुरु असलेला सामना पावसामुळे थांबवण्यात आला.कोलंबो येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित करण्यात आले होते.मात्र,भारतीय संघाने शानदार सुरुवात केल्यानंतर पावसाला सुरुवात झाल्याने दिवसाचा पुढील खेळ होऊ शकला नाही.अखेर हा सामना राखीव दिवशी म्हणजे सोमवारी (11 सप्टेंबर) खेळला जाणार आहे.
साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाल्याने या सामन्यावर सर्वांचे लक्ष होते.या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय संघासाठी कर्णधार रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी जबरदस्त सुरुवात देताना शतकी भागीदारी केली.गिलने आक्रमक 58 तर रोहितने 56 धावा केल्या.121 धावांची सलामी दिल्यानंतर ते तंबूत परतले.त्यानंतर विराट कोहली व केएल राहुल यांनी भारताचा डाव पुढे नेला.भारतीय डावातील 24.1 षटके झालेली असताना पावसाचे आगमन झाले.त्यावेळी भारतीय संघाने दोन बाद 147 धावा केल्या होत्या.

रात्री नऊ वाजेपर्यंत मैदान खेळण्यासाठी तयार न झाल्याने अखेर सामना राखीव दिवशी करण्याचा निर्णय घेण्यात आला.सोमवारी (11 सप्टेंबर) दुपारी तीन वाजता भारतीय संघ 24.1 षटकांच्या पुढे सुरू होईल.सोमवारी हा सामना पूर्ण होण्याची अपेक्षा सर्वांना असेल.सोमवारीही पाऊस आल्यास दोन्ही संघांना एक-एक गुण देण्याचा निर्णय आशियाई क्रिकेट परिषदेने घेतलेला आहे.
सलग तीन दिवस सामने
भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना सोमवारी पूर्ण होणार आहे.हा सामना सोमवारी पूर्ण झाला तर भारतीय संघाला मंगळवारी पुन्हा मैदानात उतरावे लागेल. कारण,सुपर 4 फेरीतील भारताचा दुसरा सामना मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे त्यामुळे सलग तीन दिवस भारतीय संघ मैदानात दिसेल.या व्यतिरिक्त 16 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध बांगलादेश असा सामना होईल.







































































