Last Updated on 03 Nov 2022 7:01 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर | कोल्हापूर शहरात व तालुक्याच्या ठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्गातील 50 उमेदवारांची 1 अभ्यासिका याप्रमाणे अभ्यासिकांकरीता बार्टी मार्फत पुस्तके व फर्निचर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.अभ्यासिकेच्या निर्मितीसाठी अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या 500 पेक्षा जास्त असणाऱ्या व अशा वस्त्यांमध्ये समाज मंदिर, संविधान भवन असणाऱ्या गाव, तालुका, शहर, नगरपालिका, महानगरपालिका यांनी संबंधित ग्रामसेवक, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी, नगरपालिका, कार्यकारी अभियंता, महानगरपालिका यांच्याशी तातडीने संपर्क साधावा,असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले.
अभ्यासिकेची निर्मिती केल्यास बहुमुल्य पुस्तके व संदर्भ ग्रंथ उपलब्ध करुन दिल्याने गाव, तालुका, वस्ती, शहर, नगरपालिका, नगरपरिषद मधील 500 पेक्षा अधिक अनुसूचित जातीची लोकसंख्येची वस्ती असणाऱ्या ठिकाणी जास्तीत-जास्त अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी केंद्रीय व राज्य प्रशासकीय सेवेत आणण्याचे उद्दीष्ट आहे. अभ्यासिकेचे सनियंत्रण व देखरेख अनुसूचित जाती युवकांचा स्वयंसहाय्यता युवा गट, स्थानिक पदाधिकारी माध्यमातून केले जाईल. तसेच अभ्यासिकेची दैनिक कार्यपद्धती/नियमन, नियमित तपासणी विद्यार्थी निवडीचे निकष याबाबत संबंधित संस्था, यंत्रणा व बार्टी यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात येईल.
अभ्यासिकेची निर्मिती करताना संस्था निवडीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय संस्थांना प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर अशासकीय संस्था, समाजसेवी, सामाजिक संघटना यांना प्राधान्य देण्यात येईल. संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेकडून अभ्यासिकेसाठी प्रस्तावित ठिकाण हे मध्यवर्ती व विद्यार्थ्यांना सोईचे असावे. अभ्यासिका या अनुसूचित जातीच्या उमेदवारांकरीता नि:शुल्क असाव्यात.
किमान 500 पेक्षा जास्त अनुसूचित जातीची लोकसंख्या असणाऱ्या भागातच अभ्यासिका उभारण्यात येईल. अभ्यासिकेकरीता 50 उमेदवारांच्या बैठकीची पुरेशी व्यवस्था, स्वच्छता गृह, पिण्याचे पाणी व इतर सोयी सुविधा उपलब्ध असणे आवश्यक राहील.










































































