Last Updated on 19 Jul 2023 7:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
चिपळूण : वशिष्ठी नदीने गाठली धोक्याची पातळी
मुंबई । कोकणात पूरस्थितीची परिस्थिती असून रत्नागिरी,चिपळूण,रायगड,पालघर या भागात जोरदार पाऊस सुरू असून बऱ्याच भागात पुरसदृश्य स्थिती तयार झाली आहे.वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून नदीच्या पाण्याने धोकापातळी गाठली आहे.चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.
मुसळधार पावसामुळे आज बुधवारी चिपळूण परिसरात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.वाशिष्ठी व शिवनदी दुथडी भरून वाहत आहे.बाजारपेठमध्ये पाणी शिरल्याने नगरपरिषदेने सलग तीन वेळा भोंगा वाजवून व शहरात गाडी फिरवून सतर्कतेचा इशारा दिला.पावसामुळे येथील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. बुधवारी पहाटेपासून येथे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.त्यानंतर देखील पावसाची संततधार सुरुच आहे.त्यामुळे चिपळूण येथील वाशिष्ठी व शिवनदीने पुन्हा धोक्याची पातळी गाठली आहे.रत्नागिरी येथे कोळकेवाडी धरण व धरण परिसरात काल रात्री 8 वाजल्यापासून कोळकेवाडी धरण व धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधत चिपळूणसह जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. हवामान खात्याने येत्या चार दिवसात राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खबरदारीच्या उपाययोजना तातडीने कराव्यात, मदतकार्य तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम तैनात ठेवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी आमदार शेखर निकम देखिल उपस्थित होते.दरम्यान,रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशावरून चिपळूण व खेड या दोन्ही तालुक्यांतील शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे.
कोकणासह राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा
राज्यात पावासाचा जोर गेल्या दोन दिवसांपासून वाढला आहे.हवामान खात्याने येत्या चार दिवसात कोकणासह राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे, तसेच वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. वाशिष्ठीचे पाणी धोकापातळीपर्यंत वाढले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत खबरदारीच्या उपाययोजना म्हणून आवश्यक त्या ठिकाणी नागरिकांचे तातडीने स्थलांतर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पूरामुळे बाधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या.
दोन वर्षापूर्वी वाशिष्ठी नदीला आलेल्या पूरामुळे चिपळूणमध्ये मोठी वित्तहानी झाली होती. त्यावेळी वाशिष्ठी नदीच्या पात्रातील गाळ काढण्यासाठी विशेष निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याच्या कामाची माहिती सुध्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या.









































































