Last Updated on 16 Sep 2024 9:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit
👉 टाकावू प्रेसमडपासून गॅस निर्मितीही (सीबीजी) करणार
👉 राजारामबापू इंडोमेन्ट ट्रस्टच्या माध्यमातून पूर्वीसारखी ऊस उत्पादक सभासदांना दुर्धर आजारासाठी आर्थिक सहाय्य सुरु करणार
👉 आरआयटीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सभासदांच्या मुला-मुलींना आर्थिक सहाय्य सुरु करणार
सांगली । केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी उठविली असून या गळीत हंगामात सिरप व बी हेवी मोल्यासिसपासून इथेनॉल निर्मितीवर भर देणार असल्याची घोषणा राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी केली. राजारामबापू इंडोमेन्ट ट्रस्टच्या माध्यमातून पूर्वीसारखी ऊस उत्पादक सभासदांना दुर्धर आजारासाठी,तसेच आरआयटीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सभासदांच्या मुला-मुलींना आर्थिक सहाय्य सुरु करीत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ५५ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. माजी मंत्री आ.जयंत पाटील, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, कार्यकारी संचालक आर.डी.माहुली प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद करीत मार्गदर्शन केले.

प्रतीक पाटील म्हणाले, आपण पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रातील पाहिला सौर ऊर्जा प्रकल्प उभा केला आहे. त्यापासून आपली विजेची मोठी बचत होणार आहे. त्याचबरोबर टाकावू प्रेसमडपासून गॅस निर्मिती (सीबीजी) ही करणार आहोत. आपल्या कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव- सुरुल युनिटची गाळप क्षमता वाढविण्याचा आपला प्रयत्न आहे. आपण गेल्या वर्षी चार युनिट मध्ये १९ लाख १० हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून २३ लाख २५ हजार क्विंटल साखर निर्मिती केली आहे. तिन्ही युनिटला रुपये ३१००,तर तिप्पेहळळी युनिटला रुपये २९०० ऊस दर दिला आहे.
देशात ३२० लाख मेट्रीक टन साखरेची निर्मिती झाली असून देशात २९० लाख टन साखरेची मागणी आहे. उत्पादनापेक्षा मागणी कमी असल्याने साखरेस दर मिळण्यात अडचणी येत आहेत. आपण रुपये १४७ ची ठेव परत केली असून त्याचे एक वर्षाचे व्याज ऑक्टोबर मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करीत आहोत. आपण प्रति महिना ७ किलो साखर ९ किलो केलेली आहे.
पी.आर.पाटील म्हणाले,केंद्र सरकारने प्रथम इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन दिले. मात्र त्यानंतर अचानक बंदी घातली. त्यामुळे साखर कारखान्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील म्हणाले, रुपयाचे अवमूल्यन हा देशातील सर्वात मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. शेतकऱ्यांनी याचा अभ्यास करायला हवा. वाढलेल्या ऊस तोडणी आणि वाहतूक दराची झळ शेतकऱ्यांना बसत आहे. सरकारने शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार देण्यापेक्षा निर्याती बंदया उठविल्यास शेतकरी श्रीमंत होईल. यावेळी काही रविंद्र पिसाळ,शंकर मोहिते,लक्ष्मण पाटील,बाजीराव पाटील यांच्यासह सभासद शेतकऱ्यांनी काही सूचना मांडल्या. यावेळी अध्यक्ष प्रतिकदादा पाटील,कार्यकारी संचालक आर.डी.माहुली यांनी सभासदांचा प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.
प्रारंभी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक आर.डी.माहुली यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. सचिव डी.एम.पाटील यांनी श्रद्धांजली ठराव मांडून मागील इतिवृत्त वाचन केले. संचालक बाळासाहेब पवार यांनी आभार मानले. संदीप तांबवेकर यांनी सूत्र संचालन केले.
यावेळी शामराव वाटेगावकर,भीमराव पाटील,विजयराव यादव,शशिकांत पाटील, दिलीपराव वग्याणी,विराज शिंदे,बाळासाहेब पाटील,संजय पाटील,शहाजी पाटील,सुस्मिता जाधव,सुनिता देशमाने,रणजित पाटील, संग्राम फडतरे,सर्जेराव देशमुख,डॉ.एन.टी. घट्टे,कार्तिक पाटील,विठ्ठल पाटील,प्रदीप कुमार पाटील,सौ.मेघा पाटील,कामगार नेते शंकरराव भोसले यांच्यासह आजी-माजी संचालक,ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









































































