Last Updated on 17 Oct 2025 5:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । एका बाजूला ऊसाचे एकरी उत्पादन कमी होत चालले असून दुसऱ्या बाजूला उत्पादन खर्च वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आपण कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात ऊसाचे एकरी उत्पादन वाढवू शकतो,असा विश्वास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कृत्रिम बुद्धिमत्ता कृती गटाचे अध्यक्ष, माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
राजारामनगर येथे राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना,केव्हीके बारामती आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ” ऊस पिकासाठी कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर”या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील, व्हीएसआयचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.कपिल सुशिर, कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, बांधकाम समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन करण्यात आले.
आ.पाटील म्हणाले, आपल्या कारखान्या तून ४०० च्यावर शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. आपण २५-२५ शेतकऱ्यांचे गट करू आणि ५ किलोमीटरच्या परिघात हवामान केंद्र उभा करू. या केंद्रातून आपणास पर्जन्यमान,तापमान,वाऱ्याचा वेग व दिशा समजणार आहे. तसेच सेन्सॉर मुळे जमिनीची आद्रता,तापमान समजणार आहे. त्यातून अचूक पाणी व्यवस्थापन करण्यात येईल. तसेच उपग्रहाच्या सहाय्याने पिकातील रोग- कीड अन्नद्रव्यांची कमतरता,यावर काय करावे? या शिफारशीसह मिळणार आहे. राजारामबापू साखर कारखाना आपल्या पाठीशी भक्कम पणे उभा असून व्हीएसआय कडून आपणास मोबाईल ऍपवर अद्यावत माहिती,मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळणार आहे.
डॉ.कपिल सुशिर म्हणाले,राजारामबापू साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्याकडून कृत्रिम बुध्दिमत्ता प्रणालीचा अंगीकार करण्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील हे व्हीएसआयच्या एआय कृती गटाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात झपाट्याने एआय तंत्रज्ञाना प्रसार होत आहे.
प्रतिकदादा पाटील,एआय तंत्रज्ञानाचा अधिक गतीने प्रसार व्हावा,तसेच आपल्या साखर कारखान्याच्या विविध योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचविण्यासाठी गटावर स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करणार आहोत. आपले काही प्रश्न,शंका असतील तर मांडा,आपण व्हीएसआयकडून मार्गदर्शन घेऊ. राज्यात ज्या-ज्या ठिकाणी एआय तंत्र ज्ञानाचा ऊस शेतीसाठी वापर केला आहे, त्या-त्या ठिकाणी आपणास पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.
प्रगतशील युवा शेतकरी अमोल लकेसर यांनी आमचा नेतृत्वावर पूर्ण विश्वास असून आम्ही एआय तंत्रज्ञानाचा अभियान यशस्वी करून दाखवू,अशी भावना व्यक्त केल्या. .
प्रारंभी मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी रघुनाथ जाधव,प्रतापराव पाटील,बबनराव थोटे,दादासाहेब मोरे,रमेश हाके,हणमंत माळी,डॉ.योजना शिंदे-पाटील,वैभव रकटे, दिलीपराव देसाई,रामराव पाटील,डॉ.प्रकाश पाटील,युवराज सुर्यवंशी,संभाजी पाटील, विठ्ठल चव्हाण यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी आभार मानले.







































































