Last Updated on 26 Aug 2025 2:08 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । गणेशोत्सवाचे दिवस जवळ येताच गावोगावी गणेश मूर्तींची लगबग सुरू झाली आहे. यंदा कापूसखेड (ता. वाळवा) येथील संतोष कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे बंधू धनाजी कुंभार यांनी घडवलेली देखणी गणेश मूर्ती भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.
लाल झगमगते पागोटे, सोन्याचे दागिने, हातात मोदक व आशीर्वादाची मुद्रा, पिवळसर-केशरी पेहराव आणि पायाशी उभा उंदीर – या सर्व घटकांमुळे मूर्तीला भव्य व दैवी अशी छटा लाभली आहे. स्थानिक शिल्पकारांच्या बारकाईने केलेल्या कोरीव कामामुळे आणि आकर्षक रंगसंगतीमुळे मूर्ती पाहणाऱ्यांचे डोळे थक्क होत आहेत.
धनाजी कुंभार दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती घडवतात. यंदाही त्यांनी गणेश मंडळांसाठी सुमारे 11 फूट उंचीपर्यंतच्या मूर्ती तयार केल्या आहेत. त्यांच्या हाताखालून घडलेल्या मूर्तींना परिसरात चांगली मागणी असून, गणेशोत्सवात त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो.
सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून, भाविक “गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया”च्या जयघोषात बाप्पाचे स्वागत करण्यास उत्सुक आहेत.












































































