Last Updated on 09 Dec 2025 3:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । कापूसखेड (ता. वाळवा) येथे तब्बल ८७० वर्षांपासून चालत आलेल्या भोसले -पाटील वंशातील पाच भावक्यांचा सामायिक सुतक परंपरेचा अखेर समारोप झाला आहे. धार्मिक शास्त्रोक्त विधी, संतांच्या उपस्थितीत आणि सामाजिक एकतेचा संदेश देत रविवारी एक ऐतिहासिक सोहळा पार पडला.
नागपूरजवळील बाबूळगावावरून इ.स. ११५५ मध्ये मूळ पुरुष मालोजीराव कापूसखेड परिसरात दाखल झाला. त्याच्या चार मुलांपासून उरूण-ईश्वरपूर, नागठाणे, येडेनिपाणी व कापूसखेड येथे वंश शाखा वाढत गेल्या. कापूसखेडमध्ये रघु पाटील, जगू पाटील, भिकाजी पाटील, नांगरे पाटील आणि नाईकजी मोकाशी खराडे या पाच घरांचा भावबंध पिढ्यान पिढ्या टिकून राहिला. ही पाचही भावक्या एकच सुतक मानत असल्याने या कुटुंबांना धार्मिक उत्सव, शुभकार्ये, देवपूजा, गृहप्रवेश, नामकरणासारख्या विधींमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
वेळ बदलली, पिढ्या बदलल्या; पण परंपरा आणि सुतकाचे बंधन अविरत राहिले. मात्र, नवीन पिढी आणि ज्येष्ठ मंडळी यांनी एकत्र येत ‘सामायिकतेतून स्वतंत्रतेकडे’ जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच या ऐतिहासिक विधीचा प्रारंभ झाला.
शास्त्रोक्त विधी, वैभवशाली व्यवस्था, सामाजिक संस्कारांचा उत्सव संकेश्वर (करवीर) संस्थान मठाचे श्री जगद्गुरू शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्यानृसिंहभारती स्वामी यांच्या उपस्थितीत, तसेच आनंद दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसांचा शास्त्रोक्त विधी पार पडला. होम – हवन, संकल्प, पुरश्चरण, आणि पंचकुल प्रतिनिधींसह पूर्ण धार्मिक प्रक्रिया अत्यंत वैभवशाली आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. या पाच घरांतील प्रतिनिधी सुविद्य पत्नींसह धार्मिक विधींना बसले होते.
रविवार, दि. ७ डिसेंबरपासून सुरू झालेला विधी ८ डिसेंबरच्या सकाळी पूर्ण झाला. विधीच्या समाप्तीनंतर स्वामीजींनी औपचारिकरीत्या सुतक वेगळे झाले अशी घोषणा केली आणि ८७० वर्षांचा सांस्कृतिक गाठीचा गुंता उकलला गेला. संस्कृतीची सातत्यता आणि आधुनिक सहजीवनाचा सुंदर संगम या प्रसंगी ग्रामस्थ आणि सर्व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात आदरातिथ्य, व्यवस्था आणि पारंपरिकतेचा संगम अनुभवायला मिळाला. महाप्रसादाने या ऐतिहासिक अध्यायाची सांगता झाली.







































































