Last Updated on 08 Nov 2023 9:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सदाभाऊ खोत,आ. गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत बैठक
मुंबई । राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात उद्या (गुरुवारी) मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत,आ. गोपीचंद पडळकर आदींच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.तशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली.
राज्यातील एसटी कर्मचारी त्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात दिनांक 07 ऑक्टोबर 2023 पासून आझाद मैदान,मुंबई येथे बेमुदत आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे.या मागण्यांसंदर्भात आपल्या स्तरावर तात्काळ वैठक आयोजित करावी अशी मागणी माजी मंत्री सदाभाऊ खोत,आ. गोपीचंद पडळकर यांनी निवेदनाद्वारे केली होती.त्या अनुषंगाने उद्याची बैठक होत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या अशा
1) सातव्या वेतन आयोगानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवाजेष्ठतेनुसार वेतनश्रेणी लागू करावा.
2) आंदोलन काळातील दिनांक-27/10/2021 ते 22/04/2022 पर्यंतचा आंदोलनाचा कालावधी विशेष वाव म्हणून वार्षिक वेतनवाढ, उपदानासाठी ग्राह्य धरण्यात यावा.
3) सन 2017 मधील आगार बदलीचे परिपत्रक रद्द करून शिस्त व आवेदन कार्य पद्धतीमधील जाचक अटी
रद्द करण्यात याव्यात.
4) कॅशलेस मेडिकल योजना लागू करण्यात यावी.
5) एप्रिल 2016 पासून वार्षिक वेतन वाढ महागाईभत्ता व घरभाडे याचा फरक मिळावा.
6) दिवाळी भेट 5000 ऐवजी 15000 रुपये देण्यात यावा.
7) लिपिक पदाच्या खाते अंतर्गत बढती परीक्षेस 240 उपस्थित दिवसांची अट रद्द करावी
8) शासनाने जाहीर केलेल्या 5150 इलेक्ट्रिक वाहने वस खाजगी न देता रा.प. महामंडळाच्या स्वमालकीच्या देण्यात याव्यात.
9) विधान भवनात मान्य केलेल्या 16 मागण्यांची अंमलबजावणी करण्यात यावी.










































































