Last Updated on 05 Nov 2023 6:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit
बळीराजा शेतकरी संघटना आक्रमक : साखर आयुक्तांना मागण्यांचे निवेदन सादर
पुणे । ऊसाला प्रतिटन 5 हजार रूपये भाव मिळावा,नाहीतर उसाचं कांडंही तोडू देणार नाही असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे लेखी निवेदन बुधवारी संघटनेच्या वतीने साखर आयुक्तांना देण्यात आले.राज्य सरकारने झोनबंदी आदेश तात्काळ मागे घ्यावा तसेच साखर संकुल आवारात राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘शेतकरी भवन’ उभारण्यात यावे अशीही मागणी साखर आयुक्तांकडे यावेळी करण्यात आली.
बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले.यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा आघाडी अध्यक्ष गणेश शेवाळे,बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष नितीन पाटील,सातारा जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत यादव,सांगली जिल्हा अध्यक्ष अशोक सलगर,कराड अध्यक्ष विशाल बडेकर,कोल्हापूर जिल्हा युवा अध्यक्ष विठ्ठल गावडे,कराड तालुका युवा अध्यक्ष नितीन शिंदे,वाळवा तालुका अध्यक्ष बाळासो सलगर,श्रीकांत देवकर (सातारा),अमोल कोले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.येणाऱ्या गळीत हंगामात उसाला 5 हजार रुपये दर द्यावा,नाहीतर एकही कांडं तोडून देणार नाही तसेच रास्ता रोको करून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा चंद्रकांत यादव व गणेश शेवाळे यांनी यावेळी दिला.
साखर आयुक्तांना दिलेल्या निवेदनातील मागण्या अशा
1) राज्य सरकारने झोनबंदी आदेश तात्काळ मागे घ्यावा.त्याबाबतचा शासन आदेश शासनाने त्वरित जारी करावा.
2) राज्यातील काही कारखान्यांनी गेल्या गळीप हंगामातील एफआरपीची संपूर्ण रक्कम उत्पादक शेतकऱ्यांना देणे बाकी आहे.सदर एफआरपी रक्कम 15 टक्के व्याजासहीत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावी.
3) गेल्या गळीत हंगामातील दुसरा हप्ता टनाला पाचशे रुपये प्रमाणे मिळावा
4) येणाऱ्या गळीत हंगामातील उसाला टनास पाच हजार रुपये प्रमाणे दर मिळावा
5) एफआरपी मधून तोडणी – ओढणीची रक्कम वजावाट न करता सदर रकमेचा भार शासन आणि कारखानदारांनी सोसावा
6) साखर संकुल आवारात राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘शेतकरी भवन’ उभारण्यात यावे.
यंदा शेतकऱ्यांसमोर उभे ठाकलेले दुष्काळी संकट,त्याचबरोबर वाढती महागाई,मजूर टंचाई,डिझेल,खते,औषधे यांचे वाढलेले दर यामुळे राज्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.त्यामुळे शासनाने संघटनेच्या मागण्यांचा गांभिर्याने विचार करून राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर त्वरीत तोडगा,उपाययोजना कराव्यात अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन उभारेल यात्री नोंद घ्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.










































































