Last Updated on 19 Nov 2023 7:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा । ऊसदर प्रश्नी बळीराजा शेतकरी संघटना गेल्या चार दिवसापासून आक्रमक झाली आहे.शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या काही भागात संघटनेने आंदोलन करत सुमारे 60 ते 70 ऊस वाहतुकीच्या वाहनांच्या चाकातील हवा सोडून दिली.जोपर्यंत ऊस दर मिळत नाही, तोपर्यंत उसाची वाहतूक करू नका, अन्यथा वाहनाच्या चाकातील हवा सोडली जाईल, असा कडक इशारा देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांवरील अन्याय कदापि सहन करणार नाही,अशी भूमिका बळीराजा शेतकरी संघटनेने घेतली आहे.सातारा जिल्ह्यातही संघटना आक्रमक झाली असून सातारा व सांगली रस्त्यावर उसाने भरलेले ट्रॅक्टर रात्री नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास अडविले. ऊस दर आंदोलन सुरू असताना वाहतूक का करता ? असा सवाल करत त्यांनी सुमारे 60 ते 70 वाहनांच्या चाकातील हवा सोडून दिली. यापुढे अशा पद्धतीने आंदोलन सुरू राहील, असा इशारा बळीराजा संघटनेचे युवा अध्यक्ष गणेश शेवाळे यांनी दिला आहे.
कराड -कासेगाव परिसर,पाटण -कराड रस्ता, मलकापूर, तासवडे टोल नाका,मल्हारपेठ, निसरे फाटा,तांबवे फाटा,पाटण रस्ता- वारूंजी फाटा परिसरात आंदोलनाने व्यापक स्वरूप घेतले असून रविवारी रात्री देखील वाहने रोखण्यात आली.मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेने दिला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी सकाळी अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरू केल्याने पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली आहे.बळीराजा आणि स्वाभिमानी संघटनेच्या चक्काजाम आंदोलनाने दोन्ही जिल्ह्यातील साखर कारखानदारांचे धाबे अक्षरशः दणाणले आहेत.
या आंदोलनात बळीराजा शेतकरी संघटनेचे गणेश शेवाळे,स्वाभिमानीचे देवानंद पाटील,बळीराजा चे चंद्रकांत यादव,उत्तम साळुंखे,बापूराव साळुंखे,सतीश यादव आदी कार्यकर्ते सहभागी झाले.











































































