Last Updated on 25 Dec 2025 6:20 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । ईश्वरपूर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला आज दमदार सुरुवात झाली. उरुण परिसरातील शासकीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर झालेल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी अत्यंत रोमहर्षक सामने झाले. टीम युवराजने दमदार कामगिरी करत दोन सामने जिंकत वर्चस्व सिद्ध केले. तर टीम रोहित, टीम धोनी व टीम कपिल यांनी प्रत्येकी एक सामना जिंकला. टीम सूर्या व टीम धोनी यांचा सामना बरोबरीत सुटल्याने स्पर्धेतील चुरस अधिकच वाढली आहे.
चाळीस वर्षावरील क्रिकेट स्पर्धेला आज उत्साहात सुरुवात झाली. स्पर्धेतील सामन्यांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. अनुभवी खेळाडूंनी आपल्या खेळीने प्रेक्षकांची मने जिंकली.

स्पर्धेचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील,उरुण सोसायटीचे चेअरमन महेश पाटील, जेष्ठ खेळाडू मामा इटकरकर, बाबुराव वाठारकर यांच्या हस्ते झाले.
पहिला सामना विराट विरुद्ध धोनी यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना धोनी संघाने ८६ धावा केल्या. यात संतोष परीट यांनी ३० तर मिलींद कुंभार यांनी १९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. प्रत्युत्तरात विराट संघाला केवळ ६७ धावांपर्यंत मजल मारता आली. विराट संघाकडून जयवंत पाटील यांनी २५ यांनी चांगला खेळ केला. हा सामना धोनी संघाने १९ धावांनी जिंकला.
दुसरा सामना टीम रोहित विरुद्ध द्रविड संघ यांच्यात पार पडला. टीम रोहितने ३ बाद १०२ धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये जीशान शेख यांनी ३८, कुमार माने यांनी २५ तर निवास पाटील यांनी २२ अशी उपयुक्त खेळी केली. प्रत्युत्तरात प्रतिस्पर्धी संघाला फक्त ६५ धावा करता आल्या. विनोद शिंदे यांनी २५ धावांचे योगदान दिले. हा सामना टीम रोहितने ३७ धावांनी जिंकत विजय मिळवला.
तिसरा सामना युवराज विरुद्ध सचिन यांच्यात झाला. युवराज संघाने प्रथम फलंदाजी करत ८ षटकांत ९१ धावा केल्या. यात इस्माईल मुल्ला यांनी शानदार ४३ धावांची खेळी केली. अरुण कानडे यांनी १६ धावा केल्या. प्रत्युत्तरात सचिन संघाने ८० धावा केल्या. हा सामना युवराज संघाने १० धावांनी जिंकला.
चौथा सामना सूर्या विरुद्ध धोनी संघांमध्ये झाला. प्रथम फलंदाजी करताना धोनी संघाने ७८ धावा केल्या. हा सामना अत्यंत चुरशीचा ठरला. शेवटच्या षटकापर्यंत उत्कंठा कायम होती. सूर्या संघांच्या अमोल पाटील यांनी २९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत शेवटच्या चेंडूवर चौकार मारून सामना बरोबरीत सोडवला.
पाचवा सामन्यात टीम युवराजने द्रविड संघावर ३८ धावांनी विजय मिळवला. युवराज संघाने आठ षटकात १०१ धावा केल्या. द्रविड संघाचा डाव ६३ धावांवर आटोपला. टीम युवराजच्या इस्माईल मुल्ला यांनी ४२ धावा केल्या.
सहावा सामना टीम कपिल व विराट यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना विराट संघाने ५२ धावा केल्या. प्रतिउत्तरा दाखल कपिल संघाने हा
सामना सहज जिंकला. यात एन. एस. पाटील यांनी २३ धावांची खेळी केली. स्पर्धेतील सर्व सामने अत्यंत रंगतदार झाले.
पुढील सामन्यांकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. ४० वर्षावरील खेळाडूंनी दाखवलेला उत्साह आणि खेळाची गुणवत्ता सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे.
आज झालेल्या सामन्यांसाठी विशाल कडगावे, मिलिंद कुंभार, दत्ता परीट, जहांगीर नरदेकर, संभाजी बाबर,विनोद शिंदे, शशिकांत सूर्यवंशी डॉ. प्रताप पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. अरविंद कार्वेकर, धनंजय भोसले यांनी गुणलेखनाचे काम केले
आजचे सामनावीर
इस्माईल मुल्ला ( टीम युवराज-दोन वेळा),
कपिल घस्ते व संतोष परीट ( टीम धोनी)
जीशान शेख टीम ( रोहित)
एन. एस .पाटील ( कपिल)










































































