Last Updated on 09 Feb 2024 11:09 PM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्लामपुरात निषेध मोर्चा; मोर्चातील तिरडीवरून झटापट…शरद पवार गट आक्रमक, पदाधिकारी संतप्त
निवडणूक आयोग व भाजपा केंद्र सरकारचा निषेध : आ.जयंत पाटील समर्थनार्थ कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
सांगली । इस्लामपूर (ता.वाळवा) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते व पोलिसांमध्ये निवडणूक आयोग व भाजपा केंद्र सरकारच्या निषेध मोर्चातील तिरडीवरून जोरदार झटापट झाली.पोलिसांनी तिरडी हिसकावून घेण्याचा,तर कार्यकर्त्यांनी उरली-सुरली तिरडी पेठ-सांगली रस्त्यावर जाळण्याचा प्रयत्न केला.याप्रसंगी युवक कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते.यावेळी कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोग व भाजपा सरकारच्या निषेधाच्या,तसेच राष्ट्रीय नेते खा.शरदचंद्र पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
निवडणूक आयोगाने पक्षपाती निर्णय घेत खा.शरदचंद्र पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्याच्या निषेधार्थ निषेध मोर्चाचे आयोजन केले होते.दंडास काळ्या फिती आणि हातात काळे झेंडे घेऊन पंचायत समितीपासून छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पर्यंत निषेध मोर्चा येणार होता.सकाळी ११ वाजता कार्यकर्ते पंचायत समितीच्या प्रांगणात एकत्र आल्यानंतर निषेध मोर्चास सुरुवात केली. मात्र पोलिसांनी मोर्चातील तिरडीला आक्षेप घेत तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला.यावेळी युवक कार्यकर्त्यांनी त्यास विरोध केल्याने मोठी झटापट झाली. युवक कार्यकर्त्यांनी उर्वरित तिरडी रस्त्यावर जाळत पोलीस बळाचा निषेध व्यक्त केला. यानंतर मोर्चा झरी नाका,आझाद चौक,लाल चौक,गांधी चौक,यल्लाम्मा चौकातून कचेरी चौकात आला.येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला. यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,शहराध्यक्ष शहाजी पाटील,संजय पाटील,वैभव शिंदे,माजी नगराध्यक्ष अँड.चिमण डांगे,माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील,खंडेराव जाधव,महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव,शहराध्यक्षा रोझा किणीकर,युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव,कार्याध्यक्ष देवराज देशमुख,आष्टा शहराध्यक्ष शिवाजी चिरमुले,माजी सभापती शैलेंद्र सुर्यवंशी,डॉ.धनंजय माने,कल्लाप्पा पोचे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोग व भाजप सरकारचा तीव्र शब्दात जाहीर निषेध केला. नही चलेगी नही चलेगी,दादागिरी नही चलेगी; लढेंगे और जितेंगे; लोकशाहीची हत्या करणाऱ्या निवडणूक आयोगाचा धिक्कार असो; नाही झाला काकांचा,तो काय होणार लोकांचा; आले शंभर,गेले शंभर,खा.पवारसाहेब, आ.जयंत पाटील एक नंबर; भाजपा सरकारचे करायचे काय? खाली डोके वर पाय आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी नेताजीराव पाटील,विनायक पाटील,बाळासाहेब पाटील,देवराज पाटील, आनंदराव मलगुंडे,अँड.विश्वासराव पाटील, आनंदराव पाटील,शशिकांत पाटील,सुहास पाटील,विश्वनाथ डांगे,अरुणादेवी पाटील, सुनिता देशमाने,कमल पाटील,पिरअली पुणेकर,विराज शिंदे,बबनराव थोटे,सचिन कोळी,स्वरूप मोरे,सचिन पाटील,सुनिल मलगुंडे,परेश पाटील यांच्यासह इस्लामपूर, आष्टा या शहरासह तालुक्यातील गावोगावचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक सिध्देश्वर जंगम व सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.












































































