Last Updated on 25 Jan 2025 7:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुक्तांगण प्ले स्कूल आणि क्वेस्ट संस्थेचा उपक्रम : वाचन व लेखनाच्या गोडीसाठी होणार प्रयत्न
सांगली । इस्लामपूर येथील मुक्तांगण प्ले स्कूल आणि क्वेस्ट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने इस्लामपुरातील शाळकरी मुलांसाठी “गोष्टरंग” नावाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. २७ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान शहरातील विविध शाळांमध्ये मुलांना वाचन व लेखनाची गोडी लावण्यासाठी हा उपक्रम असेल. प्रसिध्द रंगकर्मी शाळेच्या आवारात मुलांसमोर बालसाहित्यातील गोष्टी नाट्यरूपाने सादर करणार असल्याची माहिती मुक्तांगणच्या संचालिका वर्षाराणी मोहिते यांनी दिली.
त्या म्हणाल्या, “क्वेस्ट ही मुलांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावं म्हणून कार्यरत असलेली संस्था आहे. या संस्थेचे पहिली पायरी, पालवी, बालभवन, अनुपद असे अनेक उपक्रम महाराष्ट्रातील जवळपास सतरा जिल्ह्यांमध्ये चालतात. क्वेस्टतर्फे वाचन लेखनाची गोडी निर्माण करण्यासाठीचा उपक्रम म्हणजे गोष्टरंग. या उपक्रमांतर्गत अंगणवाडी, प्ले स्कूल, पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी या वयोगटांसाठी वेगवेगळी नाटकं बसवली गेली आहेत. त्या नाटकांचे प्रयोग महाराष्ट्राभर सुरू आहेत. प्रत्यक्ष रंगभूमीवरील कामाचा अनुभव असलेले १८ ते २५ वयोगटातील उत्साही तरुण-तरुणी गोष्टरंग उपक्रमात सादरीकरण करतील. यावेळी गोष्टींच्या पुस्तकांवर आधारित काही खेळ व कृती घेतल्या जातील. त्यामुळे पुस्तकातील गोष्टी जिवंत होतील. यानिमित्ताने मुलांचे मनोरंजन तर होईलच आणि वाचन लेखनाची गोडी लागेल. बांबू , मी तर मांजर आहे, आई आणि मी या गोष्टींचे सादरीकरण होईल.
त्या म्हणाल्या, “सोमवारी २७ जानेवारी ते शनिवारी १ फेब्रुवारी या दरम्यान गोष्टरंगचा दौरा इस्लामपूर शहरात आहे. या दौऱ्यात प्री-प्रायमरी, प्रायमरी, सेकंडरी या तीनही वयोगटांसाठी तीन नवीन नाटकं गोष्टरंगचे कलाकार सादर करतील. यातील प्रत्येक नाटकाचा कालावधी साधारण वीस ते पंचवीस मिनिटे आहे. नाटकांसोबतच नाटकांवर आधारित पूरक अँक्टिव्हिटी मुलांसोबत घेतल्या जाणार आहेत.” मुक्तांगणचे सचिव विनोद मोहिते संयोजन करीत आहेत.










































































