Last Updated on 19 Oct 2024 9:20 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ.जयंत पाटील हे गुरुवार दि.२४ ऑक्टोबर २०२४ रोजी इस्लामपूर येथे महाविकास आघाडीच्या वतीने आठव्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. गुरुवारी सकाळी १० वाजता वाळवा पंचायत समितीपासून भव्य रॅली शहराच्या मुख्य मार्गावरून गांधी चौकात येईल. येथे रॅलीचे सभेत रूपांतर केले जाईल. यानंतर आ.पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करतील. या दिवशी इस्लामपूर,आष्टा शहरासह वाळवा तालुका व मिरज तालुक्यातील ८ गावातील हजारो कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहतील,अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. आघाडीतील मित्र पक्षांच्या सह आम्ही एकदिलाने ही निवडणूक लढवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रा.शामराव पाटील, माजी नगराध्यक्ष ॲड.चिमण डांगे, शहराध्यक्ष शहाजी पाटील, पै.भगवान पाटील, माजी उप नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने, संजय पाटील, माजी नगरसेवक खंडेराव जाधव,ॲड.धैर्यशिल पाटील, विश्वनाथ डांगे, राज्य सरचिटणीस अरुण कांबळे, सुरेंद्रदादा पाटील, संदीप पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
विजय पाटील म्हणाले, राज्यातील जनता महागाई व भ्रष्टाचाराने त्रस्त असून शेती मालास भाव नाही,मुलांच्या हाताला रोजगार नाही,महिलांच्यावरील अत्याचार वाढले आहेत,कायदा व सुव्यस्था ढासळली आहे. त्यामुळे राज्यात बदल होणार आहे.
ॲड.चिमण डांगे म्हणाले,आ.जयंतराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शनाने भरणार आहोत. मतदार व कार्यकर्त्यांची रॅली झरी नाका,आझाद चौक,गणेश मंडई,कापुस खेड नाका,यल्लाम्मा चौकातून गांधी चौकात येईल. येथे जाहीर सभा होईल. दुपारी २ नंतर अर्ज दाखल केला जाईल. या सभेस महा विकास आघाडीतील मित्र पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करीत आहोत.
प्रा.शामराव पाटील म्हणाले,आ.जयंतराव पाटील यांनी गेल्या ४० वर्षात तालुका व मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करताना सर्वांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केलेले आहे. या मतदारसंघातील जनतेने त्यांना सात वेळा मोठ्या फरकाने निवडून दिले आहे. या वेळीही त्यांचे मताधिक्य १ लाखाच्यावर राहील. त्यांचे मॉडेल स्कुल,स्मार्ट पीएचसी हे उपक्रम राज्यात राबविले जात आहेत.
शहाजी पाटील म्हणाले,नेता व जनतेचे नाते कसे असावे,हे परवाच्या शिव स्वराज्य यात्रेच्या सांगता सभेच्या निमित्ताने संपूर्ण राज्याने पाहिले आहे. परवा सारखीच अर्ज भरण्याची रॅली व सभा भव्य होईल.
खंडेराव जाधव म्हणाले,आ.जयंतराव पाटील यांचे काम आणि त्यांची सध्याच्या राजकारणातील भूमिका पहाता ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी,अशी जनतेची इच्छा आहे. मात्र विरोधक एकमेकांचे उसने उमेदवार घेऊन रडीचा डाव खेळत आहेत. त्यांच्याकडे कोणताही विचार,विकास नाही.
ॲड. धैर्यशिल पाटील म्हणाले,राज्यात परिवर्तनाची लाट असून राज्यात निश्चितपणे महाविकास आघाडीचे सरकार येईल.
युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव,महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात,माजी अध्यक्षा रोझा किणीकर,शंकरराव चव्हाण,शैलेश पाटील,दिग्विजय पाटील,सचिन कोळी, अभिजित रासकर,विशाल माने यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

इस्लामपूर मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज
निवडणूक बैठकीला दांड्या मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : निवडणूक अधिकारी
वाहनांवर प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावताय… तर हे पहा
फिरत्या वाहनावर ध्वनीक्षेपकास निर्बंध; जाणून घ्या वेळ
तलाठी नव्हे आता ‘ग्राम महसूल अधिकारी’; शासन निर्णय जारी












































































