Last Updated on 30 Jun 2025 4:52 PM by Sanjay Patil/Adhorekhit
धुळे । केंद्रीय शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता लागू करण्यात आली आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी 31 ऑगस्ट 2025 पर्यंत राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल 2.0 वर ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (योजना) श्रीमती पुष्पावती पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.
एनएमएस परीक्षेत शैक्षणिक वर्ष 2024-2025 मध्ये निवड झालेल्या जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी सन 2025-2026 शैक्षणिक वर्षाकरीता इयत्ता 9 वीत शिक्षण घेत असलेल्या नवीन अर्जदार म्हणून आणि 9 वी, 10 वी, 11 वी उत्तीर्ण झालेल्या शिष्यवृत्ती धारकांनी स्वत:ची नोंदणी करावी. यापुर्वी शिष्यवृत्ती घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठ दहावी, अकरावी आणि बारावीसाठी नूतनीकरण अर्जदार म्हणुन स्वत:चे नूतनीकरण करावे लागेल.
एनएमएमएससाठी पात्रता : पालकांचे उत्पन्न 3 लाख 50 हजार रुपयापेक्षा जास्त नसावे. उत्पन्नाचा दाखला हा सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा आवश्यक आहे. शासकीय स्थानीक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानीत शाळेतील विद्यार्थ्याना ही योजना लागु आहे. केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय तसेच केंद्र व राज्य शासनाकडून वसतीगृहाची सवलत घेत असलेल्या शासकीय तसेच खाजगी विनाअनुदानित शाळेतील खाजगी अनुदानीत सैनिकी शाळेतील विद्यार्थी हे शिष्यवृत्तीसाठी अपात्र असतील.
इयत्ता 10 वी नंतर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेत असल्यास शिष्यवृत्तीसाठी अपात्र करण्यात येईल. इयत्ता 10 वी मध्ये सर्वसाधारण विद्यार्थ्यांस 60 टक्के पेक्षा जास्त गुण आवश्यक तर अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांस 5टक्के सुट राहील. इयत्ता 9 वी मधुन 10 वी मध्ये गेलेले विद्यार्थी व 10 वी मधुन 12 वी मध्ये विद्यार्थी प्रथम प्रयत्नात पास होणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेतील विद्यार्थ्याच्या नावाचे खाते असावे. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचे आधारकार्ड असावे. व विद्यार्थ्यांच्या बँक खात्याशी आधारकार्ड संलग्न् असावे. विद्यार्थ्यांची ज्या प्रगर्वातून निवड झाली आहे. त्या प्रगर्वातूनच शिष्यवृत्ती रक्कम वार्षिक 12 हजार जमा होईल.
महत्वाच्या तारखा : एनएमएमएस व प्री मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी ऑनालाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट, 2025 असून जिल्हास्तर अर्ज पडताळणी 30 सप्टेंबर रोजी होईल. असेही शिक्षणाधिकारी ( योजना) पुष्पावती पाटील यांनी कळविले आहे.










































































