Last Updated on 24 Dec 2024 8:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सालचे वेळापत्रक जाहीर झाले असून कट्टर प्रतिस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तान २३ फेब्रुवारीला एकमेकांना भिडणार आहेत. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी ही १९ फेब्रुवारी रोजी सुरू होणार असून ९ मार्च रोजी त्याचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद हे पाकिस्तानकडे आहे. पण भारत आणि पाकिस्तानचे सामने, तसेच भारताचे सर्व सामने हे हे यूएईमधील दुबई शहरात आयोजित करण्यात येणार आहेत.
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना हा पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना १९ फेब्रुवारीला कराचीमध्ये होणार आहे. त्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना झाल्यानंतर २० फेब्रुवारीला होणार आहे. तर अफगाणिस्तानचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. हा सामना देखील कराचीमध्ये होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांचा सामना २२ फेब्रुवारीला होणार आहे.
कराची, लाहोर , रावलपिंडी आणि दुबई इथं हे सामने खेळले जाणार आहेत. भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहे. सुरक्षाविषयक कारणांमुळे भारतानं पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता, आयसीसीने भारताचा हा निर्णय मान्य केल्यामुळे पाकिस्ताननं हे सामने युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये ८ संघांमध्ये एकूण १५ सामने होणार आहेत. सर्व संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. तर भारत आणि पाकिस्तान एकाच गट अ मध्ये असणार आहेत. त्यासोबतच दोन संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश आहेत. तर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड या संघांना ब गटात ठेवण्यात आले आहे. हे सर्व सामने दिवस-रात्र असणार आहेत.
चॅम्पियन ट्रॉफीचे दोन गट
अ गट – भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांग्लादेश
ब गट – अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड
चॅम्पियन्स ट्रॉफीचे संभाव्य वेळापत्रक
१९ फेब्रुवारी, पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची
२० फेब्रुवारी, भारत विरुद्ध बांगलादेश, तटस्थ
२१ फेब्रुवारी, अफगाणिस्तान विरुद्ध आफ्रिका, कराची
२२ फेब्रुवारी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर
२३ फेब्रुवारी, भारत विरुद्ध पाकिस्तान, तटस्थ
२४ फेब्रुवारी, बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी
२५ फेब्रुवारी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध आफ्रिका, रावळपिंडी
२६ फेब्रुवारी, अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर
२७ फेब्रुवारी, पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी
२८ फेब्रुवारी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान, लाहोर
१ मार्च, इंग्लंड विरुद्ध आफ्रिका, कराची
२ मार्च, भारत विरुद्ध न्यूझीलंड, तटस्थ
४ मार्च, उपांत्य फेरी १, तटस्थ
५ मार्च, उपांत्य फेरी २, लाहोर
९ मार्च, अंतिम, तटस्थ/लाहोर
बाद फेरीसाठी राखीव दिवस
भारत नॉकआउट सामनेही तटस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहेत, जर भारत अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही तर हा सामना लाहोरमध्ये खेळवला जाणार आहे. सर्व बाद फेरीच्या सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.








































































