Last Updated on 03 Dec 2024 11:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । शेतकरी नेते, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना मंत्रिमंडळात विस्तारात स्थान द्यावे अशी मागणी शेतकरी वर्ग तसेच रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांतून होत आहे. राज्यातील सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते सदाभाऊंना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्यासाठी आग्रही आहेत.
रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा व महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे नेते तथा शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी गेल्या अनेक वर्षांपासून महायुतीमध्ये निष्ठेने काम केले व महायुतीतील अनेक उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांना २०१९ व २०२४ या दोन्ही लोकसभेमध्ये निवडून आणण्यामध्ये सदाभाऊ खोत यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जत मतदारसंघातून गोपीचंद पडळकर, शिराळा मतदार संघातून सत्यजित देशमुख यांच्या विजयात आ. खोत यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर इस्लामपूर मतदार संघातून निशिकांत भोसले-पाटील यांचा निसटता पराभव झाला. आ. जयंत पाटील यांचा अल्पमतातील विजय यापेक्षा निशिकांत भोसले- पाटील(दादा) यांचा निसटता पराभव हा अधिक चर्चीला जात आहे. सदाभाऊ खोत यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या भाषणातून रांगड्या भाषेत विरोधकांवर टीकेची झोड उठवली होती.

फार्णेवाडी येथे दत्त श्री दत्त मंदिरात सदाभाऊ खोत यांना मंत्रिपद मिळावे म्हणून श्री दत्तगुरुंना अभिषेक करण्यात आला.
शेतकरी चळवळीत काम करताना कोल्हापूरच्या उसापासून नाशिकच्या कांद्यापर्यंत. कधी हमीभावाच्या मागणीसाठी, तर कधी निर्यातीवरच्या बंधनांविरोधात. कधी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे, तर कधी तहसील कार्यालयासमोर निदर्शनं. मराठवाड्यातल्या दुष्काळाची चाहूल लागताच पहिली दुष्काळ दिलासा यात्रा काढली. लोकसभेला माढा मतदार संघातील जिव्हारी लागलेल्या निसटत्या पराभवाचं दु:ख मागे सारून कामाला लागत सदाभाऊ यांनी शेतकरी चळवळीचे काम नेटाने पुढे सुरूच ठेवले.
मंत्रीपद मिळताच पहिल्याच आठवड्यात सदाभाऊ खोत यांनी आपलं वेगळेपण दाखवून दिलं. मार्केट मुक्ती आणि अडतीच्या निर्णयांमुळे उद्भवलेल्या अडचणीत रस्त्यावर उतरले. पहाटे पाच वाजता मार्केटमध्ये घुसून शेतकऱ्यांना भाजीपाला विकण्यासाठी मदत केली. व्यापाऱ्यांच्या मक्तेदारीतून शेतीमालाला सोडवण्यासाठी, बाजार समित्यांच्या विळख्यातून भाजीपाल्याला सोडवण्यासाठी मार्केटमध्ये जातीनं उभे राहिले. खोत यांनी कृषी आणि पणन या दोन्ही खात्यांच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.आपल्या फर्ड्या भाषणानं सभा गाजवणारे, गावाकडच्या भाषेत थेट बांधावरचे प्रश्न मांडणारे, शेतकऱ्याच्या काळजाला हात घालणारे सदाभाऊ खोत यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला मोठे बळ मिळणार आहे. मंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांनी सर्वसामान्यांसाठी आपल्या ‘हक्काचा मंत्री’ म्हणून उल्लेखनीय काम केले आहे.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील मोठा शेतकरी वर्ग हा सदाभाऊ खोत यांचा चाहता आहे शिवाय गेल्या अनेक वर्षांपासून सदाभाऊ खोत हे महायुतीचे व महायुतीच्या सरकारची कामे सर्वसामान्य जनतेपर्यंत व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहेत. याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील रयत क्रांती संघटनेचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते त्याचप्रमाणे शेतकरी वर्ग यांची सदाभाऊ खोत यांना पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रीपदावर पाहण्याची इच्छा व उत्सुकता आहे. राज्यातील महायुतीतील वरिष्ठ नेतेमंडळी सदाभाऊंना मंत्रिमंडळात स्थान देऊन रयत क्रांती संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करतील, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
दूध दरवाढी साठी आंदोलन, दुधाचे अनुदान अशा विविध गोष्टी व आंदोलने करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम सदाभाऊ खोत यांनी केले आहे. तर ऊसाच्या एफआरपीसाठी आंदोलन असेल एसटी कामगारांची आंदोलने व सत्ता नसताना सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलने करून भाजपला बळ देण्याचे काम आतापर्यंत सदाभाऊंनी केलेले आहे. याची पोचपावती म्हणून महायुतीने आमच्या नेत्याला न्याय द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.









































































