Last Updated on 30 Jun 2025 8:40 PM by Sanjay Patil/Adhorekhit
धुळे । महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) अधिनियम, 2025 अंतर्गत 1 जुलै 2025 पासून नवीन कर दर लागू करण्यात येत आहेत. अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी चारुदत्त व्यवहारे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
नवीन कर दरानुसार, सीएनजी किंवा एलपीजीवर चालणाऱ्या खाजगी दूचाकी व चारचाकी वाहनांकरिता खालीलप्रमाणे कर आकारला जाईल:
वाहनाची किंमत ₹10 लाखापर्यंत असल्यास – 8 टक्के कर
₹10 लाखांवरून ₹20 लाखांपर्यंत असल्यास – 9 टक्के कर
₹20 लाखांपेक्षा जास्त असल्यास – 10 टक्के कर
तसेच, बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांसाठी, जर वाहनाची किंमत ₹30 लाखांपेक्षा अधिक असेल, तर 6 टक्के कर आकारण्यात येईल. बांधकाम कार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेन्स, कॉम्प्रेसर्स, प्रोजेक्टर्स वा खनित्रे अशा मोटार वाहनांवर वाहनाच्या किंमतीच्या 7 टक्के कर एकरकमी स्वरूपात आकारला जाईल.
याशिवाय, नोंदणीकृत वजन 7500 किलोग्रॅमपेक्षा कमी असलेली, ओझे वाहून नेणारी हलकी मालवाहतूक वाहने, जी माल किंवा सामग्रीच्या वाहतुकीसाठी वापरली जातात, त्यांनाही वाहनाच्या किंमतीच्या 7 टक्के एकरकमी कर आकारण्यात येणार आहे. हा सुधारीत कर 1 जुलै 2025 पासून लागू राहणार आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन श्री. व्यवहारे यांनी केले आहे.










































































