Last Updated on 01 Apr 2025 8:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
पृथ्वी आणि आकाशाच्या पोकळीतील परस्परविरोधी वातावरण आणि ढगांच्या घर्षणाने वीज तयार होते. ढगांमधील पाणी,हिमकण आणि वारा यांच्या एकत्रित येण्याने ढगांमधून मोठा आवाज होतो.आकाशात चमकणाऱ्या विजांपैकी केवळ 5 टक्के विजा जमिनीपर्यंत पोहोचतात.सर्वात जवळची वीजवाहक व्यक्ती किंवा वस्तूकडे वीज आकर्षित होते,त्यामुळे अशा काळात वीजवाहक वस्तू जीवघेण्या ठरतात.
दरवर्षी पावसाळ्यात अंगावर वीज पडून अनेक जणांना आपला जीव गमवावा लागतो. कारण विजेचा कडकडाट सुरू असताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, याची माहिती बऱ्याच जणांना नसते.विजेचा कडकडाट सुरू असताना नेमकी काय दक्षता घ्यायची,कोणत्या गोष्टी टाळायच्या हे महत्वाचे आहे.पावसाळ्यात अनेक लोक विजा चमकू लागल्या आणि पाऊस पडू लागला तर झाडाखाली जाऊन थांबतात. मात्र ही खूप मोठी चूक ठरू शकते. कारण झाड विजेचा सुवाहक आहे आणि त्याच्या उंचीमुळे वीज पडण्याची शक्यता जास्त असते.
![]()
घरात असताना काय काळजी घ्यावी
आपल्याकडे घर बनवताना मोठ्या प्रमाणात स्टील आणि सिमेंटचा वापर केला जातो. त्यामुळे विजांचा कडकडाट सुरू असताना भिंतीला चिकटून बसू नका. कारण भिंतींमध्ये असणाऱ्या स्टीलमधून देखील वीज वाहू शकते.जरी तुम्ही घरात असाल तरी देखील तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागते. विजांचा कडकडाट आणि गर्जना होत असताना विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. कारण जर आजूबाजूला वीज पडली तर घरातील विद्युत प्रवाह अचानक वाढू शकतो.जरी विजांचा कडकडाट थांबला तरी इलेक्ट्रिक चार्जेस (जेव्हा या चार्जेसचा प्रवाह ढगातून जमिनीत काही क्षणात वाहतो, त्यालाच आपण वीज पडणं म्हणतो) काही वेळेसाठी ढगांमध्ये तरंगत असतात.त्यामुळे विजेचा कडकडाट थांबला तरी अर्धा ते एक तासासाठी घराच्या बाहेर पडू नका.
ही दक्षता घ्या
🌑 शेतात काम करताना शेताजवळील घराचा आसरा घ्यावा.
🌑 शेतातील सुरक्षित ठिकाणाचा आसरा घेतल्यानंतर पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवा.
🌑 दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसा.
🌑 पायाव्यतिरिक्त शरीराचा कुठलाही भाग जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी.
🌑 ओल्या शेतात अथवा तलावात काम करणाऱ्या व्यक्तींनी तत्काळ कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जावे.
🌑 पोहणारे, मच्छिमारी करणारे यांनी त्वरित पाण्यातून बाहेर यावे.
🌑 झाडापासून झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे रहावे.
🌑 पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. शक्य असल्यास आपल्या घरावर वीज वाहक यंत्रणा बसवावी.
🌑 आपले घर शेतात असल्यास जवळपास कमी उंचीची झाडे लावावीत.
🌑 वृक्ष, दलदलीचे ठिकाण किंवा पाण्याचे स्रोत यापासून शक्यतो दूर रहा.
🌑 चारचाकी वाहनातून प्रवास करीत असल्यास वाहनातच थांबावे.
🌑 मात्र वाहनाच्या काचा बंद ठेवण्याची काळजी घ्यावी.
🌑 कोणत्याही परिस्थितीत लॅपटॉप, अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरू नये. लँडलाइन फोन्स वापरू नयेत.
🌑 पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईलवर दामिनी ॲप डाऊनलोड करुन घ्यावे.
या गोष्टी टाळा
🌑 खुल्या मैदानात उभे राहू नका. विजा सर्वात जास्त खुल्या मैदानात पडतात.
🌑 झाडाखाली उभे राहू नका. उंच ठिकाणी किंवा झाडावर चढू नका.
🌑 विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर इत्यादीजवळ उभे राहू नका.
🌑 दोन चाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर, नौका यावर असाल तर तत्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जा.
🌑 वाहनाच्या बाहेर थांबल्यास धातूचे कोणतेही उपकरण जवळ बाळगू नका.
🌑 एकाच वेळी जास्त व्यक्तींनी एकत्र थांबू नये. दोन व्यक्तींमध्ये किमान १५ फूट अंतर राहील याची काळजी घ्या.
🌑 पाण्याचा नळ, फ्रीज, टेलिफोन यांना स्पर्श करू नका, शिवाय त्यापासून दूर रहा.
🌑 विजेवर चालणारे यंत्र तसेच धातूपासून बनलेल्या वस्तूंपासून दूर रहा.
🌑 मोबाईलचा वापर टाळा.
![]()
(टीप : ही माहिती विविध माध्यमे तसेच विविध लेखामधून गोळा करून तुमच्यासाठी आणली गेली आहे. आमचा हेतू फक्त माहिती पोहोचवणे आहे.)






































































