Last Updated on 10 Nov 2023 9:35 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । उसाला 400 रुपये दुसरा हप्ता मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी बावची फाटा (ता.वाळवा) याठिकाणी ‘राजारामबापू’ व ‘हुतात्मा’ साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारे 50 ट्रॅक्टर अडविले.दोन्ही साखर कारखान्यांचे संचालक व प्रशासनाने उद्यापासून ऊसतोड व वाहतूक बंद ठेवण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदरची वाहने सोडण्यात आली.
दरम्यान,संघटनेच्या कार्यकर्त्यांची आक्रमकता बघता यापुढील काळात ऊस दर आंदोलन पेटण्याची शक्यता आहे.
आष्टा इस्लामपूर रोडवर बावची फाटा याठिकाणी भागवत जाधव व जगन्नाथ भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 15 ते 20 कार्यकर्त्यांनी राजारामबापू व हुतात्मा साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारे 50 ट्रॅक्टर अडविले.यावेळी जगन्नाथ भोसले,पंडित संपकाळ,प्रताप पाटील,सचिन यादव,गणी मुल्ला,शामराव जाधव,विलास यादव.संपत भोसले,पांडुरंग यादव,पोपटराव सुतार उपस्थित होते.
हेही वाचा – पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना…ऑनलाईन अर्ज करा
यावेळी वाहनधारक व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली.आक्रमक झालेले कार्यकर्ते वाहने सोडण्यास तयार नव्हते.अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांच्याबरोबर संचालक व प्रशासनाने फोनवरून चर्चा केली.यावेळी झालेल्या चर्चेत जोपर्यंत ऊस दराचा प्रश्न सुटत नाही,तोपर्यंत ऊसतोड व वाहतूक बंद ठेवण्याचे आश्वासन साखर कारखाना संचालक व प्रशासनाने दिले. त्यानंतर वाहने सोडण्यात आली.
शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देऊ
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव म्हणाले,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे.यंदा कमी पाऊसमान असल्याने साखर कारखाने 80 ते 85 दिवस चालणार आहेत.शेतकऱ्यांनी थोडी दिवस कळ सोसावी यंदा शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देऊ.
हेही वाचा – राज्यातील केळीची युरोप येथे प्रायोगिक निर्यात










































































