Last Updated on 19 Mar 2025 8:55 AM by Sanjay Patil/Adhorekhit
Sunita Williams’ Return To Earth : नासा क्रू-9 मोहिमेतील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स, निक हेग, बुच विल्मोर आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोरबुनोव्ह हे स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून यशस्वीरित्या पृथ्वीवर परतले. नऊ महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर या सर्व अंतराळवीरांनी पृथ्वीवर पाऊल ठेवले. या सर्व अंतराळवीरांचे कॅप्सूल फ्लोरिडा किनारपट्टीजवळील समुद्रात उतरले आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.
भारतीय वंशांच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन अंतराळवीर 5 जून 2024 रोजी स्टारलायनरमधून आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनकडे झेपावले होते. तिथे ८ दिवस घालवल्यानंतर ते परतणार होते. मात्र त्यांच्या अंतराळयानामध्ये बिघाड झाला. त्यामुळे ते दोघेही तिथेच अडकून पडले. यानंतर नासाकडून सातत्याने त्यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु होते. अखेर अनेक अडचणी पार केल्यानंतर आज म्हणजेच भारतीय वेळेनुसार 19 मार्चच्या पहाटे सर्व अंतराळवीर सुखरुपपणे परतले.

9 महिन्यांनंतर, सुनीता अखेर अंतराळातून पृथ्वीवर परतली आहे. त्याच्यासोबत, बुच, निक हेग आणि अलेक्झांडर गोर्बुनोव्ह देखील पृथ्वीवर परतले आहेत. आज, बुधवार, 19 मार्च, भारतीय वेळेनुसार पहाटे 3:27 वाजता (मंगळवार, 18 मार्च रोजी अमेरिकन वेळेनुसार सायंकाळी 5:57 वाजता), सुनीताचे अंतराळयान पृथ्वीवर यशस्वीरित्या उतरले.
नासाच्या माहितीनुसार, सुनीता विलियम्स यांनी स्पेस स्टेशनबाहेर तब्बल 62 तास 9 मिनिटे घालवली अर्थात 9 वेळा स्पेसवॉक केले. तसेच सुनीता विल्यम्स यांनी, ‘अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी महिला’ म्हणूनही एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.सुनीता विलियम्स आणि त्यांच्या टीमने 900 तास संशोधन केले. दरम्यान त्यांनी 150 हून अधिक प्रयोगही केले. सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकात अनेक महत्त्वपूर्ण अशा संशोधन प्रकल्पांमध्ये काम केले. या अभ्यासात गुरुत्वाकर्षणाचा अंतराळातील द्रव प्रणालींवर काय परिणाम होतो हे दिसून येते. त्यांनी पाणी आणि इंधनाच्या पेशींसाठी नवे रिअॅक्टर्स विकसित करण्यासंदर्भात संशोधन केल्याची माहिती मिळत आहे.














































































