Last Updated on 26 Oct 2021 3:02 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सर्वात मोठ्या देशांतर्गत टी-20 स्पर्धा 4 नोव्हेंबरपासून सुरु होणार
मुंबई ।
भारतीय क्रिकेट संघाचा उगवता फलंदाज ऋतुराज गायकवाड याची सर्वात मोठ्या देशांतर्गत टी-20 स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. ही टी-20 स्पर्धा 4 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. ऋतुराजने आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या.
भारतीय क्रिकेट संघाचा उगवता स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड याला 2021 मध्ये खेळल्या जाणाऱ्या सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचा कर्णधार बनवण्यात आला आहे. त्याचबरोबर नौशाद शेख उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची सुरुवात ४ नोव्हेंबर रोजी होईल. महाराष्ट्राचा समावेश एलिट ए गटामध्ये असून, महाराष्ट्राचा पहिला सामना तामिळनाडूशी होईल. या गटातील सर्व सामने लखनौ येथील इकाना स्टेडियमवर होणार आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा
ऋतुराज गायकवाडने इंडियन प्रीमियर लीग २०२१ मध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याचा संघ चेन्नई सुपर किंग्जला विजेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. आयपीएलच्या 14व्या हंगामात ऋतुराजने 16 सामन्यात 635 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने शतकही झळकावले.
केदार जाधवला संघात स्थान
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव रियाझ बागबान म्हणाले, भारतीय संघाचा वरिष्ठ फलंदाज केदार जाधव याचाही महाराष्ट्र संघात समावेश करण्यात आला आहे. त्याच्याशिवाय आक्रमक सलामीवीर यश नहारलाही संघात स्थान मिळाले आहे. राहुल त्रिपाठी, सिद्धेश वीर आणि राजवर्धन हंगरगेकर सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत सहभागी होणार नसून त्यांच्या जागी स्वप्नी गुगळे, पवन शाह आणि जगदीश जोपे यांचा समावेश करण्यात आला आहे. ते पुढे म्हणाले, संघाचा उपकर्णधार असलेला राहुल त्रिपाठी दुखापतीतून सावरलेला नाही, नौशाद शेखला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे, तर सिद्धेश वीरच्या बोटाला फ्रॅक्चर आहे, राजवर्धनला अंडर-19 टी-20 दिली. चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेसाठी निवडण्यात आली आहे.
महाराष्ट्राचा संघ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), नौशाद शेख (उपकर्णधार), केदार जाधव, यश नाहर, अझीम काझी, रणजित निकम, सत्यजित बच्छाव, तरनजीतसिंग ढिल्लों, मुकेश चौधरी, आशा पालकर, मनोज इंगळे, प्रदीप दाधे, शमशु जमा काझी, स्वप्नील फुलपगार, दिव्यांग हिंगणेकर, सुनील यादव, धनराजसिंह परदेशी, स्वप्नील गुगळे, पवन शाह, जगदीश जोप.














































































